दहा तालुक्यांतील १ लाख ९० हजार बालकांना देण्यात येणार जंतनाशक गोळ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 15:27 IST2024-12-04T15:25:29+5:302024-12-04T15:27:32+5:30

आज आरोग्य विभाग राबविणार मोहीम : जंतापासून मुक्त, होतील मुले सशक्त!

Deworming tablets will be given to 1 lakh 90 thousand children in ten taluks | दहा तालुक्यांतील १ लाख ९० हजार बालकांना देण्यात येणार जंतनाशक गोळ्या

Deworming tablets will be given to 1 lakh 90 thousand children in ten taluks

दिलीप दहेलकर 
लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
जिल्ह्यातील आरमोरी व चामोर्शी तालुकेवगळता इतर १० तालुक्यात १ ते १९ वर्ष वयोगटातील एकूण १ लाख ९० हजार ९९४ लाभार्थ्यांना बुधवारी (दि. ४) जंतनाशक गोळी दिली जाणार आहे.


राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त आरोग्य विभागाने याबाबत नियोजन केले असून, शिक्षण विभाग व बालकल्याण विभाग यांच्या समन्वयाने १,९०,९९४ मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. जंतामुळे बालके व किशोरवयीन मुला-मुलींमध्ये विविध आजारांचा धोका उ‌द्भवतो. 


जंतामुळे होतात हे आजार 
जंतामुळे मुलांमध्ये अॅनिमिया, पोटदुखी, उलट्या, अतिसार, मळमळ, भूक मंदावणे यासह कुपोषण, वाढ खुंटणे आदी आजारांचा मुलांना धोका असतो. त्यामुळे १ ते १९ वयोगटातील मुलांना वर्षातून दोन वेळा जंतनाशक गोळी देणे आवश्यक आहे.


३२४४ संस्था सज्ज 
जिल्ह्यातील १७१३ अंगणवाडी केंद्रे, ११९० जिल्हा परिषद शाळा, ८४ आश्रमशाळा, ९२ खाजगी शाळा, १४ महाविद्यालय, १५१ सरकारी महाविद्यालय अशा एकूण ३२४४ संस्थांमधून मुला-मुलींना जंतनाशक गोळी देण्यात येणार आहे. या मोहिमेची जय्यत तयारी केली आहे.


बालकांच्या आरोग्याविषयी शंका आहे, मग साधा संपर्क

  • सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जंतनाशकदिनी १ १ ते २ वर्षे वयोगटातील बालकांना २०० मि.ग्रॅ. अल्बेंडाझोलची गोळी पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते. २ ते ६ वर्षे वयोगटातील बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी पावडर करून व पाण्यात विरघळून देण्यात येते. ६ ते १९ वर्षे वयोगटाच्या बालकांना ४०० मि.ग्रॅ. गोळी चावून खाण्यास किंवा पावडर करून पाण्यात विरघळून देण्यात येते.
  • बालकांच्या आरोग्याविषयी काही शंका असल्यास आरोग्य सल्ला व मार्गदर्शन केंद्राच्या टोल फ्री क्रमांक १०४वर नागरिक संपर्क करू शकतात किंवा गरज भासल्यास तातडीच्या वैद्यकीय सेवेअंतर्गत कार्यरत रुग्णवाहिका सेवेच्या टोल फ्री क्रमांक १०८ वर संपर्क करून रुग्णवाहिका मागवू शकतात, अशी माहिती जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी 'लोकमत'शी बोलताना दिली


शासकीय रुग्णालयात मिळते मोफत गोळी 
अल्वेंडाझोल ही गोळी शासकीय आरोग्य केंद्रांमध्ये मोफत दिली जाते. आरोग्य उपकेंद, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यासोबतच अंगणवाडी, शाळा, महाविद्यालयांतही या गोळ्या मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जंतसंसर्गाच्या प्रतिबंधासाठी दिली जाणारी ही जंतनाशक गोळी पूर्णपणे सुरक्षित आहे आणि मोठ्या प्रमाणावर जंतनाशक कार्यक्रमांसाठी वापरण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेद्वारे प्रमाणित करण्यात आलेली आहे.


"काही कारणास्तव ४ डिसेंबरला ज्या बालकांना जंतनाशक गोळी दिली गेली नसेल अशा वंचित सर्व बालकांना १० डिसेंबरला मॉप-अपदिनी ही गोळी देण्यात येणार आहे. पालकांनी याबाबत जागरूक राहावे." 
- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली


"आरोग्य विभागाकडून डिसेबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत जंतनाशक मोहीम राबविली जाते. या मोहिमेदरम्यान १ ते १९ वयोगटातील मुलांना अर्धी ते एक गोळी खायला किवा पाण्यात विरघळून दिली जाते." 
- डॉ. प्रफुल्ल हुलके, जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी, गडचिरोली

Web Title: Deworming tablets will be given to 1 lakh 90 thousand children in ten taluks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.