एसटी बसमध्ये लाच घेताना अटक
By Admin | Updated: August 20, 2014 23:30 IST2014-08-20T23:30:56+5:302014-08-20T23:30:56+5:30
गटसाधन केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर काम करून नोकरी सोडून गेलेल्या व्यक्तीचे जुने प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागणाऱ्या गटसाधन केंद्र कुरखेडाचे कनिष्ठ

एसटी बसमध्ये लाच घेताना अटक
वडसा येथील घटना : गटसाधन केंद्राचा कनिष्ठ अभियंता अडकला
देसाईगंज : गटसाधन केंद्रात कनिष्ठ अभियंता पदावर काम करून नोकरी सोडून गेलेल्या व्यक्तीचे जुने प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रूपयाची लाच मागणाऱ्या गटसाधन केंद्र कुरखेडाचे कनिष्ठ अभियंता संजय राऊत याला देसाईगंज बसस्थानकावर बसमध्ये लाच घेतांना आज सायंकाळी ५ वाजता अटक करण्यात आली.
ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथील रहिवासी असलेल्या तक्रारकर्त्याने २००७ ते २०१२ या कालावधीत गटसाधन केंद्र कोरची व कुरखेडा येथे कनिष्ठ अभियंता म्हणून नोकरी केली. ३० सप्टेंबर २०१२ ला त्यांनी नोकरी सोडली. त्यांना १८ लाख रूपये ६० शौचालयाच्या बांधकामाचे कार्यालयाकडून प्राप्त होणार होते. त्यांनी बिल टाकल्याने त्यांना १७ लाख १० हजार रूपये टप्प्याटप्प्याने प्राप्त झाले. ९० हजार रूपये येणे बाकी होते. तसेच अन्य एका कामाचे ५ लाख रूपयेही घेणे बाकी होते. यापैकी ४ लाख ७५ हजार रूपयांची रक्कम त्यांना मिळाली व २५ हजार रूपये येणे बाकी होते. तसेच प्रवासभत्त्याचे ५० हजार रूपये असे एकूण ७५ हजार रूपये येणे प्रलंबित होते. सदर रकमेचे बिल मंजूर करण्यासाठी गटसाधन केंद्राचे कनिष्ठ अभियंता संजय राऊत यांनी १५ हजार रूपयाची लाच तक्रार कर्त्याला मागितली होती. तक्रार कर्त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग चंद्रपूर यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यानंतर आज सापळा रचण्यात आला. कोरची तालुक्यातील बोरी येथून गडचिरोलीकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये वडसा येथे सदर पैसे आणून देण्यास सांगण्यात आले होते. सायंकाळी ५ वाजता संजय बाबुराव राऊत (४२) याला १५ हजार रूपयांची लाच घेतांना एसटीबसमध्ये रंगेहाथ पकडण्यात आले. लाचखोराला बसमध्ये पकडल्यावर शेकडो नागरिकांच्या साक्षीने पथकाने कारवाई केली. त्यानंतर त्याच्या पोलीस कारवाईसाठी प्रक्रिया सुरू करण्यात आली. सदर कारवाई पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत मतकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपअधीक्षक रोशन यादव, पोलीस निरीक्षक अजय भुसारी, दामोदर मंडलवार, सुरेश खनके, संदीप वासेकर, अरूण हटवार, मनोज पिदुकर यांनी केली आहे. (वार्ताहर)