देसाईगंजातील गाळे रिकामे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 23:46 IST2017-12-30T23:46:23+5:302017-12-30T23:46:35+5:30
स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत देसाईगंज येथे २००९ मध्ये लाखो रूपये खुर्चन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडे तत्त्वावर द्यायचे होते. मात्र सदर गाळे अजूनपर्यंत भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही.

देसाईगंजातील गाळे रिकामे
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत देसाईगंज येथे २००९ मध्ये लाखो रूपये खुर्चन गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. सदर गाळे सुशिक्षित बेरोजगारांना भाडे तत्त्वावर द्यायचे होते. मात्र सदर गाळे अजूनपर्यंत भाडे तत्त्वावर देण्यात आले नाही.
शहरामध्ये अनेक बेरोजगार युवक व्यवसाय करण्यासाठी तयार असतात. मात्र व्यवसाय करण्यासाठी आवश्यक दुकानगाळे उपलब्ध होत नाही. दुकानाची इमारत भाड्याने घेण्यासाठी लाखो रूपये मोजावे लागतात. सुशिक्षित बेरोजगारांना दुकानाच्या इमारती उपलब्ध व्हाव्या, यासाठी शासनाने स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत शहरात दुकान गाळे बांधले जातात. देसाईगंज येथे जुन्या पंचायत समितीच्या दर्शनी भागात २००९ मध्ये पाच गाळ्याचे बांधकाम करण्यात आले. मात्र अजूनपर्यंत सदर गाळे भाड्याने देण्यात आले नाही. पंचायत समितीच्या दर्शनी भागात सदर गाळे असल्याने झेरॉक्स मशीन, स्टेशनरी व हॉटेल यासारखी दुकाने सहज चालू शकतात. मात्र बेरोजगार युवकही सदर गाळे भाड्याने घेण्यास फारसे उत्सुक नसल्याचे दिसून येते. देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. ज्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत, तेथील जागेचे भाव कोट्यवधी रूपयांच्या घरात आहेत. मागील आठ वर्षांच्या कालावधीत पंचायत समितीने या गाळ्यांच्या देखभाल व दुरूस्तीकडे कायमचे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे गाळ्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. या गाळ्यांच्या भिंती व शटरला रंगरंगोटी झाल्यास बेरोजगार युवक दुकान टाकण्यास तयार होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील बहुतांश गाळ्यांची विदारक स्थिती
सुवर्ण ग्राम जयंती योजने अंतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतींना निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यामुळे दुकान गाळ्यांना भाडेकरू मिळणार की नाही, याचा विचार न करता शासनाकडून आलेले पैसे केवळ खर्च करण्याच्या उद्देशाने ग्रामपंचायतीने गाळ्यांचे बांधकाम केले आहे. मात्र आठ ते नऊ वर्षांपासून दुकान गाळे भाडेकरूविना पडून आहेत. त्यावर झालेला लाखो रूपयांचा खर्च वाया गेला आहे. सदर गाळे बेरोजगारांना उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.