कोरेगाव व चोप गावांमध्ये डेंग्यूचा कहर
By Admin | Updated: August 14, 2014 23:43 IST2014-08-14T23:43:31+5:302014-08-14T23:43:31+5:30
तालुक्यातील कोरेगाव व चोप या भागात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या दोन गावात सुमारे डेंग्यूचे १२ रूग्ण आढळलेले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष

कोरेगाव व चोप गावांमध्ये डेंग्यूचा कहर
देसाईगंज : तालुक्यातील कोरेगाव व चोप या भागात डेंग्यूची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या दोन गावात सुमारे डेंग्यूचे १२ रूग्ण आढळलेले आहेत. मात्र आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे.
कोरेगाव व चोप या दोन गावांमध्ये यावर्षी पावसाळ्याच्या अगदी सुरूवातीपासूनच डेंग्यूचे रूग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी जुलै महिन्यात डेंग्यूची साथ या गावांमध्ये पसरली होती. याबाबत ‘लोकमत’ने ११ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून आरोग्य यंत्रणेचे लक्ष वेधले होते. तरीही आरोग्य यंत्रणेने फारशी उपाययोजना या गावांमध्ये केली नाही. तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना डेंग्यूचा संसर्ग वाढू नये, यासाठी उपाययोजना करावी, असे निर्देश तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिले आहेत. मात्र ग्रामपंचायतींचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. जून महिन्यात कोरेगाव येथील एका महिलेचा डेंग्यूमुळे मृत्यूही झाला होता. डेंग्यूची लागण झालेल्या भागात आरोग्य विभागाकडून स्वतंत्र शिबिर आयोजित करून गावातील संपूर्ण नागरिकांची तपासणी करण्यात येते व त्यांना औषधोपचार करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये डेंग्यू या आजाराविषयी जनजागृती करण्यात येते. मात्र एका रूग्णाचा मृत्यू होऊनही या भागात कोणतीही उपाययोजना अजूनपर्यंत करण्यात आली नाही.
दोन्ही गावातील सुमारे १२ रूग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू हा महाभयंकर रोग असल्याने नागरिकांच्या मनामध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात धान पीक रोवणीचे काम सुरू आहे. धान रोवणीसाठी मजूर मिळत नसल्याने आबालवृद्ध धान पिकाच्या लागवडीत व्यस्त आहेत. अशा स्थितीत काही घरातील रूग्ण मात्र खाटेवर पडून आहेत. महत्वाचे म्हणजे मागील तीन महिन्यांपासून सतत डेंग्यूची साथ असतांनाही ग्रामपंचायत प्रशासनाचे गावातील कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग पडून आहेत. स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने जिल्हास्थळावरील अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष घालून या दोन्ही गावांमध्ये आरोग्य शिबिर घ्यावे, अशी मागणी आहे.