व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:37 AM2021-04-07T04:37:25+5:302021-04-07T04:37:25+5:30

भामरागड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थाची विक्री केली जात आहे. कोरोनामुळे सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला ...

Demand for action against professionals | व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

व्यावसायिकांवर कारवाईची मागणी

Next

भामरागड : जिल्ह्यातील ग्रामीण भागात काही ठिकाणी उघड्यावर अन्नपदार्थाची विक्री केली जात आहे. कोरोनामुळे सर्वत्र स्वच्छतेवर भर दिला जात आहे. असे असले तरी काही ठिकाणी अन्नपदार्थाची उघड्यावरच विक्री केली जात आहे. आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

अरुंद रस्त्यांवर ट्रॅव्हल्सचा मुक्काम

गडचिराेली : शहरातील काही ट्रॅव्हल्सधारक रस्त्याच्या कडेला ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. काही मंगल कार्यालय परिसरात असलेल्या अरुंद रस्त्यावरही ट्रॅव्हल्स उभ्या ठेवल्या जात आहे. यामुळे वाहतुकीची कोंडी होत आहे. याकडे संबंधितांनी लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.

प्रसाधनगृह नसल्याने महिलांची कुचंबणा

धानाेरा : जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही प्रवासी निवाऱ्याजवळ प्रसाधनगृह नसल्याने तसेच ज्या ठिकाणी आहे तिथे सर्वत्र अस्वच्छता असल्याने महिला प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्य परिवहन महामंडळाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी महिला प्रवाशांनी केली आहे.

जुन्या पुलांना बंधाऱ्यात रूपांतर करा

गडचिराेली : कठाणी नदीसह अनेक ठिकाणी नवीन उंच पूल बांधले आहेत. जुने व ठेंगणे पूल सुध्दा कायम आहेत. या पुलांना दरवाजे बसवल्यास बॅरेजप्रमाणे नदीत काही किलाेमीटर अंतरावर पाणी साचून राहील. यामुळे सिंचनाची सुविधा वाढून उत्पादन वाढण्यास मदत हाेईल.

विटा बनविण्याच्या कामास वेग

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यात मोठ्या प्रमाणात विटांची निर्मिती केली जाते. विटांची मागणी वाढली असल्याने विटा बनविण्याच्या कामास वेग आला आहे. अनेकांना येथून राेजगार मिळाला आहे. पुन्हा चार महिने विटा व्यवसाय चालणार आहे. आता बांधकामे सुरू झाल्याने व्यवसाय वाढला आहे.

विहिरगावातील अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा

मोहटोला/किन्हाळा : देसाईगंज तालुक्याच्या मोहटोला किन्हाळा परिसरातील विहिरगाव येथील अंतर्गत रस्ते पूर्णत: उखडले आहेत. मात्र या समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. गावातील बऱ्याच ठिकाणच्या नाल्या कचऱ्याने तुडुंब भरल्या असल्याने दुर्गंधी पसरत आहे. ग्रा.पं.ने नाल्यांचा उपसा करावा, अशी मागणी केली जात आहे.

रिकाम्या भूखंडामुळे घाण वाढली

अहेरी : आलापल्ली मार्गावर असलेल्या वस्त्यांमध्ये अनेक ठिकाणी रिकामे प्लॉट आहेत. सदर प्लॉट हे खोल असल्याने तिथे सांडपाणी साचते. दुर्गंधी, डास, घाण कचरा, अस्वच्छता यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. परिणामी लहान मुले व मोठ्या माणसांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. नगर पंचायतीने त्यांच्यावर दंडाची कारवाई करावी.

डास व कीटकनाशक फवारणी करा

गडचिरोली : शहरातील बहुतांश वार्डातील नाल्या कचरा व सांडपाण्याने तुडुंब भरल्या आहेत. ओपन स्पेसही कचऱ्याचे केंद्र बनले आहे. परिणामी डास व किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे प्रत्येक वॉर्डातील नाल्या तसेच डबक्यांमध्ये फवारणी करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून होत आहे.

कोत्तागुडम पुलाचे बांधकाम करा

अहेरी : व्यंकटापूर-अहेरी राज्य महामार्गावर बांधण्यात येत असलेल्या कोत्तागुडाम पुलाचे बांधकाम अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे नागरिकांना आवागमन करताना अडचणीचा सामना करावा लागत आहे. पुलाच्या बांधकामात खंड पडला आहे. व्यंकटापूर परिसरातील नागरिकांना अहेरी येथे येण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा असल्याने या पुलाचे बांधकाम करावे.

मालेवाडा भागातील समस्या सोडवा

कुरखेडा : कोरची व धानोरा या दुर्गम भागांना जोडणारा मालेवाडा परिसर आजही शासन व प्रशासनाच्या नजरेत दुर्लक्षित आहे. या भागात ५० किमीच्या परिसरात केवळ एकाच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भरवशावर आरोग्य सेवा आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्याची मागणी आहे.

शबरी घरकूल योजनेपासून वंचित

गडचिरोली : आदिवासी नागरिकांसाठी शबरी घरकूल योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत गरजू व पात्र आदिवासी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जातो. मात्र आदिवासी भागातील अनेक नागरिक सदर योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. यावर्षी काेराेनामुळे अनेक याेजनांच्या निधीला कात्री लागली आहे.

Web Title: Demand for action against professionals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.