वादळी पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:09+5:302021-04-24T04:37:09+5:30
शेतकरी शेताच्या बांधावर आंब्याच्या झाडांची लागवड करीत असतात. झाड मोठे होईपर्यंत त्या झाडाची मोठ्या आशेने पालन करून निगा राखत ...

वादळी पावसामुळे आंबा पिकांचे नुकसान
शेतकरी शेताच्या बांधावर आंब्याच्या झाडांची लागवड करीत असतात. झाड मोठे होईपर्यंत त्या झाडाची मोठ्या आशेने पालन करून निगा राखत असतात. शेतात लावलेल्या झाडापासून शेतकऱ्यांना हंगामी स्वरूपात आर्थिक नफा मिळत असतो. आंबा मोहर सुरू असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यांनतर झाडावरील कैऱ्यांची वाढ होऊन परिपक्व होण्यास सुरुवात होत असताना झाडावरील सर्व आंबे झाडाखाली पडून खच तयार झाला. त्यामुळे पाड येण्यापूर्वी आंबे खाली पडले. त्यामुळे सदर आंब्यांचा काही उपयोग होत नाही. साधारणतः उन्हाळ्यात आंब्याला खूप मागणी असते. प्रत्येकजण आंब्याच्या रसाची चव चाखत असतात. गावरान आंब्याला बाजारपेठेत मागणी अधिक असते. बरेचजण कृत्रिमरीत्या पिकविलेल्या आंब्यापेक्षा नैसर्गिकरीत्या पिकलेल्या आंब्याचा गोडवा चाखणे अधिक पसंत करीत असतात. यावर्षी आंब्याला चांगला मोहरही आला होता. त्यामुळे यंदा तरी गावरान आंब्याची चव चाखायला मिळेल या आशेवर सर्वजण होते; मात्र वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी आंबा शंभरीपार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गृहिणी आंब्याचे लोणचे तयार करून ते अधूनमधून जेवणात वापरून जेवणाची लज्जत वाढवीत असतात. मात्र, लोणचाच्या आंब्यालासुद्धा फटका बसला आहे. त्यामुळे यावर्षी लोणचे व आमरसाचा गोडवा चाखायला मिळेल की नाही यात शंका निर्माण झाली आहे. सध्या प्रत्येक गावात निवडक शेतकऱ्यांकडे आंबे मिळत असतात. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी आंबा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, अशी मागणी केली आहे.