आरमोरी मार्गावर घाणीचे साम्राज्य
By Admin | Updated: July 23, 2014 00:00 IST2014-07-23T00:00:58+5:302014-07-23T00:00:58+5:30
शहरातील अनेक खुल्या परिसरात नागरिक दैनंदिन कचरा टाकतात. आरमोरी मार्गावरील तुळजाबाई शाळेच्या समोरील पटांगणात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्यांचे ढिग अस्ताव्यस्त पडलेले आहेत.

आरमोरी मार्गावर घाणीचे साम्राज्य
गडचिरोली : शहरातील अनेक खुल्या परिसरात नागरिक दैनंदिन कचरा टाकतात. आरमोरी मार्गावरील तुळजाबाई शाळेच्या समोरील पटांगणात गेल्या अनेक दिवसांपासून कचऱ्यांचे ढिग अस्ताव्यस्त पडलेले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे हा कचरा सडल्यामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याकडे शाळा व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. आरमोरी मार्गासह शहरातील अन्य ठिकाणच्या खुल्या मार्गावरील कचरा उचलण्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पालिकेच्यावतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वार्डातील खुल्या परिसरात कचराकुंड्या ठेवण्यात आले आहे. मात्र अनेक नागरिक व महिला या कचराकुंड्यामध्ये कचरा टाकण्यासाठी धजावत नसल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाकडे कचरा व्यवस्थापनाबद्दल योग्य नियोजन नाही. केवळ नाल्यांचा उपसा करून तो गाळ उचण्याची कार्यवाही पालिका प्रशासनाकडून होताना दिसून येत आहे. मात्र याही कामात बरीच दिरंगाई होत असल्याचे दिसून येते. शहरातील अनेक वार्डात खुल्या परिसरात अशाच प्रकारे कचरा अस्ताव्यस्त पडला आहे. पालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे अस्वच्छतेमुळे रोग पसरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे नवनिर्वाचित नगराध्यक्ष निर्मला मडके यांनी ठोस पाऊले उचलून सुंदर व स्वच्छ शहर ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, अशीही मागणी नागरिकांनी केली आहे.