सडलेल्या धानाने केले पिकाचे नुकसान
By Admin | Updated: July 18, 2014 00:04 IST2014-07-18T00:04:18+5:302014-07-18T00:04:18+5:30
आदिवासी विविध सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने उचल केली नाही. सदर धान पूर्णपणे सडले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी या धानावर पडून वाहत

सडलेल्या धानाने केले पिकाचे नुकसान
धानोरा : आदिवासी विविध सहकारी संस्थेने खरेदी केलेल्या धानाची आदिवासी विकास महामंडळाने उचल केली नाही. सदर धान पूर्णपणे सडले आहे. पावसाळ्यात पावसाचे पाणी या धानावर पडून वाहत जवळपासच्या धानपिकाच्या शेतीत जात आहे. त्यामुळे सभोवतालचे धानपीक करपायला लागले आहे. सतत तीन वर्षांपासून नुकसान सहन करणाऱ्या शेतकऱ्याला आदिवासी विकास महामंडळाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वामन ऋषी गुरनुले यांनी केली आहे.
सुरसुंडी येथील शेतकरी वामन गुरनुले यांनी आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला धानपीक ठेवण्यासाठी कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली होती. धानाचा भाव पडल्याने सदर धान आदिवासी विकास महामंडळाने उचलले नाही. मागील चार वर्षांपासून धान याच ठिकाणी पडून आहे.
सडलेल्या धानामुळे सभोवतालच्या परिसरात दुर्गंधी निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पावसाचे पाणी धानाच्या ढिगावर पडते. त्यानंतर सदर पाणी वाहत गुरनुले यांच्याच शेतामध्ये जाते. सदर पाण्यामुळे गुरनुले यांचे धानपीक दरवर्षी करपून जात आहे. मागील चार वर्षापासून या शेतातील रूपयाचेही पीक झाले नाही. दरवर्षी मात्र त्यांना रोवण्याचा खर्च करावा लागत आहे. धानाची उचल केल्याशिवाय धानपीकाचे उत्पादन घेणे शक्य होणार नाही. गुरनुले यांनी काही कालावधीसाठीच जागा उपलब्ध करून दिली होती. मात्र हा करार मोडत त्या ठिकाणचे धान उचलण्यात आले नाही. गुरनुले यांच्याकडे शेतीशिवाय दुसरे कोणतेच साधन नाही. दरवर्षीच्या नापिकेमुळे गुरनुले यांना फार मोठा आर्थिक फटका बसला आहे. आदिवासी विकास महामंडळाने झालेली नुकसान भरपाई द्यावी, त्याचबरोबर धान ठेवल्याचे भाडेसुध्दा द्यावे, अशी मागणी उपप्रादेशिक अधिकारी व उपविभागीय अधिकारी व धानोरा तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणचे धान्य आदिवासी विकास महामंडळाने उचलले नाही. गावाजवळ असलेल्या धानाच्या ढिगामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. (तालुका प्रतिनिधी)