दलित वस्तींची कामे दलित वस्ती क्षेत्राबाहेर
By Admin | Updated: August 10, 2014 22:58 IST2014-08-10T22:58:43+5:302014-08-10T22:58:43+5:30
जोगीसाखरा गट ग्रामपंचायतंतर्गत असलेल्या सालमारा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता व जोगीसाखरा येथे नाली बांधकाम मंजूर करण्यात आले.

दलित वस्तींची कामे दलित वस्ती क्षेत्राबाहेर
जोगीसाखरा : जोगीसाखरा गट ग्रामपंचायतंतर्गत असलेल्या सालमारा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत सिमेंट काँक्रीट रस्ता व जोगीसाखरा येथे नाली बांधकाम मंजूर करण्यात आले. मात्र संबंधीत विभागाचे अधिकारी व कंत्राटदाराने सदर दोन्ही कामे दलित वस्ती क्षेत्राबाहेर सुरू केली असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. संबंधीत दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
सालमारा येथे दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ३ लाख रूपयाच्या निधीतून सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम सुरू करण्यात आले. मात्र ज्या ठिकाणी सदर रस्त्याचे काम सुरू आहे. तेथे दलित समाजाचा एकही घर नाही. तसेच ग्रामपंचायतीचा रस्ता देखील नाही. वनविभागाच्या मोकळ्या जागेवर अतिशय निकृष्ट दर्जाचे काम करून दलितांच्या हक्काचा निधीची वाट लावली जात असल्याचा आरोप सालमारा येथील नागरिकांनी केला आहे. जोगीसाखरा येथे ४ लाख ७५ हजार रूपयाच्या निधीतून ९५ मिटर अंतराचे नाली बांधकाम सुरू करण्यात आले. सदर काम दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत घेतले असले तरी दलित वस्ती व नाली बांधकामाचा मुळीच संबंध नाही, असेही नागरिकांनी म्हटले आहे. (वार्ताहर)