मासेमारांवर संकट

By Admin | Updated: August 27, 2014 23:28 IST2014-08-27T23:28:23+5:302014-08-27T23:28:23+5:30

यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाव,

Crush on fishermen | मासेमारांवर संकट

मासेमारांवर संकट

मत्स्य संस्था धोक्यात : स्त्रोतातील जलसाठा अत्यंत कमी
दिलीप दहेलकर - गडचिरोली
यावर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यल्प पर्जन्यमान व कडक उन्हामुळे जिल्ह्यात पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे. याचा विपरित परिणाम मासेमारी व्यवसायावर होत आहे. जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या तलाव, बोडी, नदी, नाल्यांमध्ये जलसाठा अत्यंत कमी असल्याने मासेमारीचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे जिल्ह्यातील ९६ मत्स्य संस्था संकटात सापडल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील मासेमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण ९४६ तलाव आहेत. यापैैकी १६ तलाव पाटबंधारे विभागाचे आहेत. एकूण ९४६ तलावांपैकी केवळ १० तलाव बारमाही वाहणारे आहेत. तर उर्वरित ९३६ तलाव हे पावसाच्या पाण्यावर हंगामी वाहणारे आहेत. जिल्ह्यातील मत्स्य सहकारी संस्थांच्यावतीने दरवर्षी जून ते आॅगस्ट या कालावधीत तलावात मत्स्य बीज टाकले जाते. मोठ्या तलावात साधारणत: मार्च महिन्यात मासेमारी केली जाते. तर लहान तलावात दिवाळीपासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील मासेमार मासेमारी करीत असतात. गडचिरोली जिल्ह्यात नदी, नाले, तलाव यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मासेमारीच्या व्यवसायातून मत्स्य संस्था मोठ्या प्रमाणात नफा कमवितात. यातून मासेमार बांधवांना पुरेसा रोजगार मिळतो. मात्र निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील मासेमारी व्यवसाय धोक्यात आला आहे.
गतवर्षी २०१२-१३ मध्ये चारदा अतिवृष्टी होऊन पूरपरिस्थिती निर्माण झाली. यामुळे मत्स्य संस्थांनी टाकलेले तलावातील मत्स्य बीज पुराच्या पाण्याने वाहून गेले. यामुळे मासेमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. गतवर्षी सारखीच परिस्थिती यंदाही निर्माण झाली आहे.
गतवर्षी ओल्या दुष्काळाने मासेमारांवर संकट ओढावले. तर यावर्षी कोरड्या दुष्काळामुळे जिल्ह्यातील नदी, नाले, तलावात अत्यल्प जलसाठा शिल्लक आहे. यामुळे मत्स्य संस्थांनी टाकलेले मत्स्य बीज तसेच जुनी मासोळी पाण्याअभावी उन्हाच्या दाहकतेमुळे नष्ट झाली. त्यामुळे यंदा मासोळीचे प्रमाण फारच कमी आहे. शासनाच्या थोड्याफार आर्थिक लाभावर यंदा मत्स्य संस्थांना मत्स्य बीज खरेदी करावे लागले. त्यातल्या त्यात बीज कंपन्यांकडून संस्थेची फसवणूक होत असल्याने अर्धेअधिक बीज सुरूवातीलाच नष्ट होतात. तसेच उरलेल्या बीजांची पुरेशी वाढ होत नाही. त्यातही बीजच्या वाढीसाठी अपेक्षेप्रमाणे पाणीसाठा उपलब्ध नसतो. त्यामुळे मुदतीपूर्वी मासेमारी करून नाईलाजाने बाजारात विक्री करावी लागते. यामुळे जिल्ह्यातील ९६ मत्स्य संस्था तोट्यात असल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत व अन्य बँका जिल्ह्यातील मत्स्य संस्थांना व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी फारसे उत्सुक नाहीत. यामुळे जिल्ह्यातील मत्स्य संस्था आणि मासेमार बांधव संकटात सापडले आहे.

Web Title: Crush on fishermen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.