मळणी यंत्र होणार स्वस्त

By Admin | Updated: August 14, 2014 23:44 IST2014-08-14T23:44:12+5:302014-08-14T23:44:12+5:30

सध्य:स्थितीत जिल्ह्यात उपलब्ध असलेले धान पिकाचे मळणी यंत्र ट्रॅक्टरवर चालतात. ट्रॅक्टरची किंमत ६ ते ७ लाख रूपयाच्या घरात आहे. मळणी यंत्राची किंमत दीड लाख रूपयाच्या दरम्यान आहे.

Crunching equipment is cheap to go | मळणी यंत्र होणार स्वस्त

मळणी यंत्र होणार स्वस्त

कृषी विभागाचा सल्ला : पॉवर टिलरवर चालणारे यंत्र बनणार
गडचिरोली : सध्य:स्थितीत जिल्ह्यात उपलब्ध असलेले धान पिकाचे मळणी यंत्र ट्रॅक्टरवर चालतात. ट्रॅक्टरची किंमत ६ ते ७ लाख रूपयाच्या घरात आहे. मळणी यंत्राची किंमत दीड लाख रूपयाच्या दरम्यान आहे. एकंदरीत संपूर्ण मळणी यंत्र ८ ते ९ लाख रूपयात पडत असल्याने एवढा खर्च करून प्रत्येक शेतकऱ्याला मळणी यंत्र खरेदी करणे शक्य होत नाही. त्यामुळे पॉवर टिलरवर चालणारे मळणी यंत्र तयार करण्याचा सल्ला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कंपनीला दिला आहे. तशा प्रकारचे यंत्र बनविण्याची इच्छाही कंपनीने व्यक्त केल्याने पुढील हंगामापासून पॉवर टिलरवर चालणारे मळणी यंत्र उपलब्ध होतील, असा आशावाद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
एकूण शेतीच्या उत्पादनात धान पिकाचा वाटा सुमारे ९० टक्केच्या जवळपास आहे. संपूर्ण जिल्ह्यात धान पिकाचे प्रचंड उत्पादन घेतले जाते. यापूर्वी धान शेतीची बहुतांश कामे मजुरांकरवी केली जात होती. मात्र नुकताच येथील शेतकरी यंत्राच्या सहाय्याने धान पिकाची शेती करू लागला आहे. यावर्षी पहिल्यांदाच रोवणी यंत्राच्या सहाय्याने धानाची रोवणी करण्यात आली. सदर यंत्र जवळपास २ लाख रूपयांमध्ये उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील असंख्य शेतकऱ्यांनी सदर यंत्र खरेदी केले.
धान रोवणीसारखीच धान मळणे वेळेवर होणे अत्यंत महत्वाचे आहे. जिल्ह्यात धान मळणी यंत्र मागील १० वर्षांपासून वापरत आहेत. सदर मळणी यंत्र ट्रॅक्टरवर चालविले जातात. ट्रॅक्टरची किंमत ६ ते ७ लाख रूपये आहे. मळणी यंत्राची किंमत दीड लाखाच्या जवळपास आहे. म्हणजेच संपूर्ण मळणी यंत्राची किंमत ८ लाखांच्या जवळपास जाते. एवढे महागडे यंत्र प्रत्येक शेतकऱ्याला खरेदी करणे शक्य होत नाही. परिणामी १० वर्षानंतरही अगदी मोजक्या शेतकऱ्यांकडे मळणी यंत्र उपलब्ध आहे. त्यामुळे मळणीचा दरही अनेक शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. सदर मळणी यंत्र पॉवर टिलरवर चालविणारे बनविल्यास अनेक शेतकरी मळणी यंत्र खरेदी करू शकतील.
पॉवर टिलर शेतकऱ्यांना अनुदानावरच उपलब्ध करून दिले जाते. त्याला जोड दीड लाख रूपयांचे मळणी यंत्र अनेक शेतकरी खरेदी करू शकतात. काही बेरोजगार युवकांनाही या मळणी यंत्राच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होऊ शकते. अशाप्रकारचे मळणी यंत्र बनविण्यात यावे, असा सल्ला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कंपनीला दिला आहे. कंपनीने अशा प्रकारचे मळणी यंत्र बनविण्यास होकारही दिला आहे. सदर मळणी यंत्र पुढील हंगामात उपलब्ध होतील, असा आशावाद व्यक्त केला जात आहे. असे झाल्यास पुढील वर्षी मळणी यंत्रांची टंचाई भासणार नाही. परिणामी अगदी माफक दरात शेतकऱ्यांना मळणी यंत्र उपलब्ध होणार असल्याने त्यांचा खर्च वाचण्यास मदत होईल.

Web Title: Crunching equipment is cheap to go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.