राजकीय नेत्यांच्या दारावर गर्दी
By Admin | Updated: August 27, 2014 23:29 IST2014-08-27T23:29:51+5:302014-08-27T23:29:51+5:30
विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. याची आचारसंहिता आठवड्याच्या आत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची चांदी आहे. वर्गणीसाठी राजकीय

राजकीय नेत्यांच्या दारावर गर्दी
गडचिरोली : विधानसभेची निवडणूक आता तोंडावर आली आहे. याची आचारसंहिता आठवड्याच्या आत जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची चांदी आहे. वर्गणीसाठी राजकीय पक्षनेत्यांच्या घराकडे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पावले वळू लागली आहेत.
यंदा गडचिरोली जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दोन तालुके टंचाईग्रस्त जाहीर झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवाचा उत्साह अद्यापही कमी झालेला नाही. जिल्हाभर ४०० ते ४५० सार्वजनिक गणपती मांडले जातात. अनेक ठिकाणी या गणेशोत्सवासाठी मंडप डेकोरेशन, लायटिंग, डीजीटल बॅनर, आकर्षक गेटची उभारणी करताना गणेश मंडळाचे सदस्य व्यस्त आहेत. गणपतीच्या आगमनासाठी व विसर्जनासाठी बँड, डी. जे. चे बुकिंगही गणेश मंडळाकडून करण्यात येत आहे.
यावर्षी गणेशोत्सव सुरू असताना निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी गणेशोत्सवाला विधानसभा निवडणुकीची झालर राहणार आहे. अनेक नेते, पुढारी यानिमित्ताने अप्रत्यक्षपणे प्रचाराचा श्रीगणेशा करण्याचीही शक्यता आहे. या संधीचा लाभ घेऊन युवकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी ते विविध क्लुप्त्या वापरण्याची शक्यता आहे. गणेशोत्सवावर निवडणुकीची झालर असल्याने पोलिसांवर बंदोबस्ताचा प्रचंड ताण येणार आहे. दोन दिवसांवर गणेशोत्सव आला असल्याने मूर्तिकारांकडेही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची गर्दी झाली आहे. मूर्तिकार मूर्तीवर शेवटचा हात मारण्याच्या तयारीला लागले आहेत. यंदा गणेश मंडळांना मोठ्या प्रमाणावर वर्गणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. निवडणुका समोर ठेवून अनेक मंडळांनी आपल्या खर्चाचे नियोजनही वाढतीवर ठेवले आहे. अलीकडेच पार पडलेल्या पोळा सणात तान्हा पोळ्याला विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी हजेरी लावून बक्षीस वितरण कार्यक्रम पार पाडले. (जिल्हा प्रतिनिधी)