तलावातील २१ अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल
By Admin | Updated: January 18, 2015 22:43 IST2015-01-18T22:43:00+5:302015-01-18T22:43:00+5:30
येथील सिंचन विभागाच्या मालकीच्या तलावातील मोकळ्या जागेत अतिक्रमण करून पक्के बांधकाम करणाऱ्या २१ जणांवर गडचिरोली पोलिसांनी भादंविचे कलम ४४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.

तलावातील २१ अतिक्रमणधारकांवर गुन्हे दाखल
गडचिरोली : येथील सिंचन विभागाच्या मालकीच्या तलावातील मोकळ्या जागेत अतिक्रमण करून पक्के बांधकाम करणाऱ्या २१ जणांवर गडचिरोली पोलिसांनी भादंविचे कलम ४४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे.
राजू देशमुख, सिद्धार्थ मेश्राम, विलास कुंभारे, संदीप बिस्वास, सुनंदा मडावी, वासुदेव बडवाईक, स्नेहल गेडाम, रघुनाथ भोयर, जया कोडे, माधुरी खोब्रागडे, वनिता बांबोळे, नरेश सिंहगडे, संजय लेनगुरे, राजू यादव, ललीता मुनघाटे, देवराव कोवाची, दिलीप चांदेकर, हिरामण जगन्नाथ, सुनिता कुंभारे, सुंदराबाई करकाडे व श्याम मोहुर्ले अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत.
गडचिरोली-चंद्रपूर मार्गावरील बट्टूवार पेटोल पंपाच्या मागे मोठा तलाव असून, या तलावाचा विस्तार गोकुळनगर व चनकाईनगरपर्यंत झाला आहे. सुमारे ५० हेक्टरहून अधिक जागेचा हा तलाव आहे. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपासून या तलावात वेगाने अतिक्रमण केले जात आहे. आतापर्यंत चार ते पाच हेक्टर जागेवर अतिक्रमण करण्यात आले आहे. अनेक शासकीय कर्मचाऱ्यांनी या तलावात पक्की घरे बांधली आहेत. काही जणांनी तर तलावाची जागा आपल्याच मालकीची समजून दुसऱ्यांना मोठ्या रकमेत विकण्याचा गोरखधंदा सुरू केला होता.
गुन्हे दाखल झालेल्या मंडळींमध्ये काही शिक्षक, महसूल व अन्य विभागातील कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांचाही समावेश आहे. सिंचन विभागाने नव्या अतिक्रमणधारकांना दोन-तीनदा नोटीसही बजावल्या. परंतु त्यांनी नोटिसीला न जुमानल्याने सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता मोहन बांडे यांनी अखेर गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार केली. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर पोलिसांनी २१ अतिक्रमणधारकांविरूद्ध कलम ४४७ अन्वये गुन्हे दाखल केले आहेत.
या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली असून, शासकीय जमीन विकून पैसे लाटणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अश्विनी शेंडे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
(स्थानिक प्रतिनिधी)