बाहेरून कापसाची आवक वाढणार ! आयात शुल्क लावण्यास ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ, शेतकऱ्यांमध्ये नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 19:47 IST2025-09-09T19:46:04+5:302025-09-09T19:47:38+5:30
Gadchiroli : २०२१ मध्ये कापसाचे भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. आज मात्र ७हजार ७०० च्या दरम्यान भाव आहे.

Cotton arrivals from abroad will increase! Deadline for imposing import duty extended till December 31, farmers unhappy
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : केंद्र सरकारने कापसावरील ११ टक्के आयात शुल्क शून्य करण्याच्या निर्णयाला ३१ डिसेंबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. आधीच कापसाला समाधानकारक भाव मिळालेला नाही. त्यातच हा निर्णय घेतल्याने यंदाही कापसाचे भाव कमीच राहण्याची शक्यता आहे. सदर निर्णयाबाबत शेतकरी वर्गात नाराजी आहे.
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यंदा कापसाचे उत्पादन घटण्याची शक्यता शेतकरी वर्तवीत आहेत. कापसावरील ११ टक्के आयात शुल्क मागे घेण्याची मुदत सुरुवातीला ३० सप्टेंबर होती. त्यानंतर ही मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविली आहे. २०२१ मध्ये कापसाचे भाव १२ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते. आज मात्र ७हजार ७०० च्या दरम्यान भाव आहे.
यंदा जिल्ह्यात १६ हजार ५२० हेक्टरवर पेरा
जिल्ह्यात यंदा १६ हजार ५२० हेक्टरवर कापूस पिकाचा पेरा आहे. शेतकऱ्यांनी कापसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. त्यामुळे उत्पादन चांगल्या प्रमाणात निघण्याची आशा शेतकऱ्यांना आहे.
कापसाचा आताच निकाल
केंद्र शासनाने आयात शुल्क कमी केल्याने बाहेरून कापसाची आवक वाढेल. परिणामी स्थानिक कापसाला योग्य भाव मिळणार नाही. त्याचे दर आपोआपच खाली घसरतील, असे एका व्यापाऱ्याने सांगितले.
सीसीआयवर मदार
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा येथे मागील वर्षीपासून कापूस हमीभाव केंद्र सुरू करण्यात आलेले आहे. सदर केंद्रावर कापूस विक्री करण्यासाठी शेतकरी नोंदणी सुरू झालेली आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत आहे.
आयात शुल्क माफीचे काय परिणाम होतात ?
परदेशातून कापूस आयात करताना त्यांना आयात शुल्क माफ केल्यास आवक वाढेल. कमी दरात बाहेरून कापूस उपलब्ध होईल. स्थानिक कापसाला योग्य भाव मिळणार नाही. याचे अनेक गंभीर परिणाम कापसाच्या बाजारपेठेतील दरावर होऊ शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय केंद्रावरच कापसाची विक्री करावी.
यंदा कापसाला आहे इतका हमीभाव
यावर्षी कापसाला शासनाने मध्यम धाग्याचा कापूस ७ हजार ७१०, तर लांब धाग्याचा कापूस ८ हजार १०० रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे. शासकीय हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांना हा भाव मिळेल.
"केंद्र शासनाने आयात शुल्क शून्य करण्याचा निर्णय घेतला असला तरी यावर्षी त्याचा स्थानिक मार्केटवर काहीच परिणाम होणार नाही. मात्र यावर्षी कापसाचे दर कमी राहण्याची शक्यता आहे. आवकनुसार बाजारात दर राहू शकतो. शेतकऱ्यांना माल सीसीआय केंद्रावर विक्री करणे सोयीचे राहील."
- राजेश बोदलकर, जिनिंग चालक, आष्टी