महामंडळाच्या बसेस निवडणुकीसाठी राखीव
By Admin | Updated: September 30, 2014 23:35 IST2014-09-30T23:35:44+5:302014-09-30T23:35:44+5:30
१५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने इत्थंभूत तयारी सुरू केली आहे. पोलीस विभागही विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे.

महामंडळाच्या बसेस निवडणुकीसाठी राखीव
गडचिरोली : १५ आॅक्टोबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासनाने इत्थंभूत तयारी सुरू केली आहे. पोलीस विभागही विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, पोलीस विभागाने केंद्रीय राखीव पोलीस दल व राज्य राखीव पोलीस दल तसेच जिल्हा पोलीस दलातील जवानांना मतदानस्थळी पाहोचविण्यासाठी महामंडळाच्या बसेस आतापासूनच अधिग्रहीत केल्या असल्याचे दिसून येते. येत्या काही दिवसात जिल्हा निवडणूक विभाग व पोलीस विभाग महामंडळाच्या बसेस, खासगी वाहने अधिग्रहीत करणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.
निवडणूक विभाग तसेच पोलीस विभागाला १५ आॅक्टोबरची विधानसभा निवडणूक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महामंडळासोबतच काळी-पिवळी टॅक्सी, ट्रक, मेटॅडोर आदी वाहने लागणार आहेत. पोलीस विभागाने येथील जिल्हा परिषदेच्या बेस कॅम्पमध्ये आतापासूनच महामंडळाच्या बसेस, खासगी ट्रक व मेटॅडोर वाहन आतापासूनच उभ्या केल्या असल्याचे दिसून येते. निवडणूक कामासाठी वापरण्यात येणाऱ्या सर्व वाहनांची परिवहन विभागाच्यावतीने तपासणीही सुरू करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रियेदरम्यान पोलीस विभागातर्फे तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यामुळे पोलीस कर्मचारी व जवानांची संख्या लक्षात घेता पोलीस विभागाने १०० बसेसची मागणी केली आहे.