तेंदूपत्ता व्यवसायावर कोरोनाचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 14:19 IST2020-04-26T14:18:18+5:302020-04-26T14:19:39+5:30
शासनाने तेंदू व्यवसायाला परवानगी दिली असली तरी त्यासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांमुळे या व्यवसायासाठी लागणारे कुशल मजूर मिळणे कठीण होणार असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन यावर्षी किती प्रमाणात होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तेंदूपत्ता व्यवसायावर कोरोनाचे सावट
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यवसायांपैकी एक असलेल्या तेंदूपत्ता व्यवसायावर यावर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावाचे सावट पसरले आहे. शासनाने तेंदू व्यवसायाला परवानगी दिली असली तरी त्यासाठी अनेक नियम घालून दिले आहेत. त्या नियमांमुळे या व्यवसायासाठी लागणारे कुशल मजूर मिळणे कठीण होणार असल्यामुळे तेंदूपत्ता संकलन यावर्षी किती प्रमाणात होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दरवर्षी उन्हाळ्यात तेंदूपत्ता तोडाई करण्याच्या कामात जिल्ह्यातील हजारो मजुरांसह लगतच्या चंद्रपूर, गोंदिया, भंडारा जिल्ह्यातील कुशल मजूर गडचिरोली जिल्ह्यात येत असतात. तेंदूपानांच्या पुडक्यांना वाळविल्यानंतर ते कट्ट्यात विशिष्ट पद्धतीने रचले जातात. या सर्व कामासाठी मजुरांचे कौशल्य पणाला लागते. परंतु यावर्षी बाहेरगावच्या मजुरांना या कामासाठी येण्यास परवानगीच नाही.
कट्ट्यात पुडके भरताना किंवा इतर सर्व कामांसाठी विशिष्ट अंतर ठेवणे आवश्यक आहे. परंतु प्रत्यक्षात कट्टा भरताना पाच ते सहा मजूर एकमेकांच्या लगत उभे राहत असतात. अशावेळी अंतराचा नियम पाळणे त्यांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या व्यवसायातील गरजा लक्षात घेऊन शासनाने योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.
जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या व्यवसायासाठी इतर जिल्ह्यातून कुशल मजुरांना येण्याची परवानगी असावी. याशिवाय फळीवर शासकीय यंत्रणेतील कर्मचाऱ्यांना देखरेखीसाठी ठेवल्यास हे काम चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
- बंडोपंत मल्लेलवार, कंत्राटदार