वेळापत्रकाबाबतचा विरोध उफाळला; आश्रमशाळा कर्मचाऱ्यांमध्ये रोष !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2024 15:59 IST2024-07-08T15:58:04+5:302024-07-08T15:59:36+5:30
अन्याय होत असल्याचा आरोप : विद्यार्थी, शिक्षकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम?

Controversy over the schedule erupted; Rage among ashram school employees!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागाच्या राज्यातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळा मागील शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून नव्या शालेय वेळापत्रकाप्रमाणे दोन सत्रात भरत आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ६ ही वेळ असलेल्या या वेळापत्रकाला राज्यातील आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे.
मागील वर्षापासून राज्यभरातील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसाठी लागू करण्यात आलेल्या वेळापत्रकामुळे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य नाराज आहेत तसेच विद्यार्थीसुद्धा त्रस्त आहेत, असा दावा आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा आहे.
नव्या वेळापत्रकाचे दुष्परिणाम विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर झाल्याचे दिसून येत आहे. नवीन वेळापत्रक अत्यंत गैरसोयीचे असून, आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारे आहे तसेच शालेय शिक्षण विभागाने दिलेल्या निर्देशांच्या विपरीत आहे. त्यामुळे नवीन वेळापत्रक बदलण्याची जोरदार मागणी होत आहे.
असे आहे आश्रमशाळेचे सध्याचे वेळापत्रक
नव्या वेळापत्रकाप्रमाणे विद्यार्थ्यांना पहाटे ५:३० वाजता उठावे लागते, तर रात्री ९:३० वाजता झोपेची वेळ असते. सोमवार ते शुक्रवारला पहिले शालेय सत्र सकाळी ८:४५ वाजता सुरू होऊन दुपारी १२:३० वाजता संपते. जेवणानंतर दुसऱ्या सत्राला दुपारी १:३० वाजता सुरुवात होते व दुपारी ४ वाजता तासिका संपल्यानंतरही हे सत्र सायंकाळी ६ वाजेपर्यंत असते. सकाळचे जेवण दुपारी १२:३० वाजता, तर रात्रीचे जेवण सायंकाळी ६:३० वाजता असते. सकाळी व सायंकाळी दोन वेळेस नास्ता असतो. शनिवारी शालेय सत्रास सकाळी ७:४५ वाजता सुरुवात होऊन ११ः ५०ला सुट्टी होते. शनिवारी दुपारी ३ ते ४:३० पर्यंत प्रेरणादायी उद्बोधन असते.
आज करणार राज्यव्यापी धरणे आंदोलन
• सिद्धूप्रणित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेने संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्या नेतृत्वाखाली सोमवार, ८ जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे आंदोलन केले जाणार आहे. जिल्ह्याच्या आश्रमशाळेतील कर्मचारी मुंबईला धडकणार आहेत.
• आश्रमशाळांची वेळ पूर्ववत सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी करणे या प्रमुख मागणीसह अनेक मागण्यांसाठी हे धरणे आंदोलन होत आहे, अशी माहिती राज्याध्यक्ष डॉ. डी. एल. कराड, राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
सर्व शाळांचे वेळ एकच हवी
शालेय शिक्षण विभागाने शाळांची वेळ सकाळी १०.३० ते ५ अशी केली आहे. सर्व शाळांना हाच नियम लागू होणे आवश्यक आहे. मात्र आदिवासी विकास विभागाने अफलातून हा निर्णय घेतला आहे. परिणामी नवे वेळापत्रक सर्वांसाठी अडचणीचे ठरत आहे.