Contract ambulance drivers have not been paid for eight months! | कंत्राटी रूग्णवाहिका चालकांना आठ महिन्यांपासून वेतनच नाही !

कंत्राटी रूग्णवाहिका चालकांना आठ महिन्यांपासून वेतनच नाही !

ठळक मुद्देकोरोना योद्धे आर्थिक विवंचनेत । वेतनासाठी प्रशासनाकडे पैसेच नाही?

प्रतिक मुधोळकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागेपल्ली : गडचिरोली जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात कंत्राटी पध्दतीने रूग्णवाहिका चालक कार्यरत आहेत. कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या आरोग्य केंद्रस्तरावरील जिल्हाभरातील एकूण ३० रूग्णवाहिका चालकांना नोव्हेंबर २०१९ पासून वेतन न मिळाल्याने हे चालक आर्थिक विवंचनेत सापडले आहेत.
जिल्हा परिषदेंतर्गत बाराही तालुक्यात मिळून एकूण ४५ प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. या आरोग्य केंद्रांतर्गत ३०० वर उपकेंद्र व पथक आहेत. जि.प. प्रशासनातर्फे निविदा काढून कंत्राटी पध्दतीने रूग्णवाहिका चालकाची नियुक्ती करण्यात आली. पदभरतीचे कंत्राट खासगी संस्था किंवा एजन्सीला मिळत असते. हे कंत्राट नागपूर येथील मानव सेवा संस्थेला मिळाले होते. मात्र शासनाकडून संस्थेला अद्यापही अनुदान न मिळाल्याने सर्व रूग्णवाहिका चालकांना नोव्हेंबर २०१९ पासून वेतन देण्यात आले नाही.
गडचिरोली जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासन कोरोना विरूध्द लढाई लढत आहेत. या लढाईत कंत्राटी रूग्णवाहिका चालकही योगदान देत आहेत. कोणत्याही सुरक्षाविना कोरोना संशयीत विलगीकरण केंद्र, विविध रूग्ण तसेच गरोदर मातांना घरापासून ते प्राथमिक आरोग्य केंद्र, तसेच उपजिल्हा व जिल्हा रूग्णालयात आणून दाखल करीत आहेत. एकीकडे कोरोना योद्ध्याचा सर्वत्र सत्कार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे कोरोनाच्या लढाईत योगदान देणाºया कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे प्रलंबित वेतन काढण्याबाबत उदासिनता आहे.

महिन्याला आठ लाखांचा होतो खर्च
प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर कार्यरत असलेल्या कंत्राटी रूग्णवाहिका चालकांच्या वेतनावर महिन्याला एकूण आठ लाख रुपये खर्च केला जातो. मात्र सद्य:स्थितीत कंत्राट मिळालेल्या संबंधित एजन्सीला एकही रुपयाचा निधी मिळाला नाही. शासनाकडून होणारी थट्टा थांबवून न्याय द्यावा, अशी मागणी चालकांनी केली आहे.

सध्या शासनाकडून निधी प्राप्त न झाल्याने कंत्राटी रूग्णवाहिका चालकांचे वेतन होऊ शकले नाही. शासनाकडे पत्र व्यवहार करून पाठपुरावा करण्यात आला असून आताही पाठपुरावा सुरू आहे. आमच्या कोरोना योद्ध्यांची आम्हाला काळजी आहे. शासनाकडून निधी प्राप्त होताच त्यांचे वेतन दिल्या जाईल.
- डॉ. शशिकांत शंभरकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, गडचिरोली

Web Title: Contract ambulance drivers have not been paid for eight months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.