नव्या बसस्थानकांची निर्मिती अडचणीत
By Admin | Updated: August 28, 2014 23:45 IST2014-08-28T23:45:25+5:302014-08-28T23:45:25+5:30
गेल्या ३५ वर्षाच्या जुन्या नियोजनावर गडचिरोली जिल्ह्यातील एसटीचा कारभार चालत आहे. राज्य शासनाने येथे विभागीय कार्यालय सुरू करण्याची घोषणा २००९ मध्ये केली होती.

नव्या बसस्थानकांची निर्मिती अडचणीत
सरकारी उदासीनता : एसटी विभागीय कार्यालय गुंडाळले
गडचिरोली : गेल्या ३५ वर्षाच्या जुन्या नियोजनावर गडचिरोली जिल्ह्यातील एसटीचा कारभार चालत आहे. राज्य शासनाने येथे विभागीय कार्यालय सुरू करण्याची घोषणा २००९ मध्ये केली होती. त्यानंतर हे कार्यालय सुरू करून अवघ्या आठवड्यातच गुंडाळण्यात आले. त्यामुळे अनेक तालुका मुख्यालयात प्रस्तावित असलेले मोठे बसस्थानकाची निर्मितीही आता वाद्यांत येण्याची शक्यता आहे. राज्य परिवहन महामंडळ या कामासाठी निधी देण्यास समर्थ नसल्याने या जिल्ह्यात बसस्थानकाची निर्मिती रखडणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील मध्यवर्ती औद्योगिक शहर म्हणून देसाईगंज शहराला ओळखले जाते़ जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक याच शहरात आहे़ मात्र, या शहरात २५ वर्षापूर्वी बांधलेले आवार नसलेले छोटेसे बसस्थानक आहे़ शहरातून कुरखेडा, ब्रह्मपुरी, नागपूर, चंद्रपूर, साकोली, गडचिरोली, लाखांदूर, राजूरा, हैदराबाद यासह संपूर्ण राज्यात धावणाऱ्या बसेस आहेत़ पूर्वीपेक्षा शहरातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे़ प्रवाशांची वाढती संख्या बघता येथे बसस्थानक आवश्यक आहे. बसस्थानकाला लागूनच नझूलची कृषी उत्पन्न बाजार समितीची जागा असून येथे बसस्थानक होऊ शकले असते मात्र ती जागा सुध्दा बाजार समितीच्या मालकीची झाली आहे़ दहा-पंधरा वर्षांपूर्वी आरमोरी मार्गावरील जागा बसस्थानकासाठी आरक्षीत करण्यात आली होती़ मात्र नंतर पाणी कुठे मूरले हे समजलेच नाही़ आणि ती जागा रद्द करण्यात आली़ सध्या नगरपालिकेने कुरखेडा मार्गावर बसस्थानकासाठी २० आर जागा आरक्षीत केल्याचे सांगण्यात येत आहे.
चामोर्शी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या आष्टी येथे एसटी आगार निर्मितीसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली. भूसंपादन केलेल्या जमिनीवर तत्कालीन परिवहन मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते बसस्थानक बांधकामाचे भूमीपूजन करण्यात आले. परंतु एसटीमहामंडळ व जमीन मालक यांच्यात वाद निर्माण झाल्याने भूसंपादनानंतर हस्तांतरणाचा मुहूर्त रखडलेला आहे. चंद्रपूर मार्गावरील मधूकर चिंतावार यांची ८ एकर जागा कलम ४ व ९ अंतर्गत भूसंपादित करण्यात आली. त्यानुसार महामंडळाने जमीन मालकाला काही रक्कम अदा केल्याचीही माहिती आहे. मात्र राज्य परिवहन महामंडळाने नंतर आष्टी येथील एसटी आगार रद्द करून बसस्थानक उभारण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे ८ एकर जागेची आवश्यकता नव्हती. एसटीमहामंडळाने रस्त्यालगतची काही जमिन देण्याची मागणी शेतकऱ्यांकडे केली. मात्र जमीन मालकाने जागा घ्यायची असेल तर पूर्ण घ्या, अन्यथा रस्त्यालगतची जागा देणार नाही. हवे तर रस्त्यालगतची जागा सोडून देऊ अशी संमत्ती दर्शविली. महामंडळाला बसस्थानकासाठी रस्त्यालगतचीच जागा हवी असल्याने शेतकरी व महामंडळ यांच्यात वाद पेटला. त्यामुळे अजुनपर्यंत जमीन हस्तांतरणाचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आष्टी येथील बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबितच आहे. १९९८ ला परिवहन मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते बसस्थानक बांधकामाचे भूमीपूजन झाले. मात्र १४ वर्ष लोटूनही बसस्थानकाचे बांधकाम झालेले नाही.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने चामोर्शी येथे बसस्थानक बांधकामाच्या दृष्टीने शहरालगतच्या गडचिरोली मुख्य रस्त्याच्या बाजुच्या जागेची पाहणी केली़ चामोर्शीतील ४ ते ५ शेतकऱ्यांची जवळपास ४ हेक्टर जमीन निवडण्यात आली़ त्या जमीनीच्या सातबारावर भू संपादनाची कार्यवाही सुरू असल्याचे नमूद करण्यात आले आहे़ ही भू संपादनाची कार्यवाही २००५- ०६ मध्ये करण्यात आली़ त्यावेळी शेतकरी व शासन यांचा जमीनीचा दर कमी होता़ आता या जमीनीचे दर लाखोंच्या घरात गेले आहेत़ त्यामुळे शेतकरी व राज्य परिवहन महामंडळात जमीनीच्या मालकीवर वादावादी सुरू असल्याने जमीन भू संपादनानंतर हस्तांतरणाचा मुहूर्त अद्याप सापडला नाही़ विभागीय कार्यालय गडचिरोली येथे सुरू राहिले असते, तर बसस्थानकाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास निश्चितच मदत झाली असती, मात्र राज्य सरकारच्या उदासीनतेमुळे विभागीय कार्यालय बंद झाले. त्यामुळे आता निर्माणाधिन व प्रस्तावित असलेले बसस्थानक होण्याची आशा मावळली आहे.