संगणक परिचालकांचे मानधन रखडले
By Admin | Updated: February 15, 2016 01:26 IST2016-02-15T01:26:00+5:302016-02-15T01:26:00+5:30
ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम कक्षात संगणक परिचालकांचे मागील पाच महिन्यांपासून मानधन रखडले असल्याने सदर संगणक परिचालक आर्थिक अडचणीत आले आहेत.

संगणक परिचालकांचे मानधन रखडले
पाच महिन्यांपासून थकीत : आर्थिक अडचण वाढली
गडचिरोली : ग्रामपंचायत स्तरावरील संग्राम कक्षात संगणक परिचालकांचे मागील पाच महिन्यांपासून मानधन रखडले असल्याने सदर संगणक परिचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून मानधन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
ग्रामपंचायतींचा कारभार आॅनलाईन करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर संग्राम कक्ष स्थापन करण्यात आले. गडचिरोली जिल्ह्यात ४५७ ग्रामपंचायती आहेत. या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये संग्राम कक्ष निर्माण करण्यात आले आहे व त्याचा कारभार पाहण्यासाठी संगणक परिचालकांची नेमणूक करण्यात आली आहे. यापूर्वी पदवीधर असलेल्या संगणक परिचालकाला ४ हजार ५०० रूपये व बारावी पास असललेल्या संगणक परिचालकाला ३ हजार ५०० रूपये मानधन दिले जात होते. प्रत्येक संगणक परिचालक सारखेच काम करीत असल्याने समान कामासाठी समान वेतन देण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर सर्वच संगणक परिचालकांना फेब्रुवारी २०१५ पासून ४ हजार ५०० रूपये मानधन देणे सुरू केले.
संगणक परिचालकांचे मानधन महाआॅनलाईन कंपनीच्या मार्फतीने दिले जात होते. मात्र कंपनीचा शासनासोबतचा करार डिसेंबर २०१५ मध्ये संपल्यानंतर आता मानधन देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेवर येऊन पडली आहे. मागील पाच महिन्यांपासून संगणक परिचालकांना मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे परिचालक आर्थिक अडचणीत आले आहेत. मानधन देण्याबाबत अनेकवेळा जिल्हा परिषदेला संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. मात्र अजुनपर्यंत जिल्हा परिषदेने मानधन दिले नाही. त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे. अत्यंत तुटपुंजे मानधन दिले जाते. तेही वेळेवर दिले जात नाही. त्यामुळे संगणक परिचालकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून मानधन तत्काळ देण्याविषयी पावले उचलावी, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)