कलेक्टर ऑफ सिरोंचा
By Admin | Updated: June 4, 2014 00:05 IST2014-06-04T00:05:39+5:302014-06-04T00:05:39+5:30
मथळा वाचून आपण निश्चितच भ्रमात पडले असाल. महाराष्ट्रात सिरोंचा नावाचा कोणताही जिल्हा नसताना ‘कलेक्टर ऑफ सिरोंचा’ ही काय भानगड आहे, असा निश्चित समज आपला झाला असेल. हा कलेक्टर कुणी प्रशासकीय

कलेक्टर ऑफ सिरोंचा
मागणी वाढली : मंत्री, नेते यांच्यासह अनेकांनी चाखली चव
नागभूषण्म चकीनारपू - सिरोंचा
मथळा वाचून आपण निश्चितच भ्रमात पडले असाल. महाराष्ट्रात सिरोंचा नावाचा कोणताही जिल्हा नसताना ‘कलेक्टर ऑफ सिरोंचा’ ही काय भानगड आहे, असा निश्चित समज आपला झाला असेल. हा कलेक्टर कुणी प्रशासकीय व्यवस्थेचा प्रमुख नाही हा आहे सिरोंचाचा आंबा.
आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, छत्तीसगड राज्याच्या शेकडो नागरिकांच्या जीभेची उन्हाळ्याच्या दिवसात चव चाखण्याची इच्छातृप्ती सिरोंचाचा हा कलेक्टर आंबा करीत असतो. सिरोंचा येथे अनेक बगीचांमध्ये कलेक्टर जातीचा हा आंबा पहावयास मिळतो. कलेक्टर आंबा हा इतर आंब्यापेक्षा मोठय़ा आकाराचा व चवीला गोड असला तरी त्याच्या आतील कोयी ही अत्यंत लहान असते. त्यामुळे हा आंबा अधिक रसभरीत असतो. सध्या या आंब्याला सिरोंचाच्या बाजारपेठेत ६0 ते ७0 रूपये किलो दराचा भाव आहे. सर्वप्रथम १९६३ मध्ये सिरोंचा ते आरडा मार्गावर प्रभात उद्यान नावाची आमराई गिरीधरभाई पोपट यांनी लावली. विस्तीर्ण ४0 एकर जागेत हा बगीचा विखुरला. या बगीच्यात सर्वप्रथम कलेक्टर आंब्याच्या झाडाचे रोपण झाल्याची माहिती जुने जाणकार देतात. प्रभात उद्यान हा बगीचा १५ ऑगस्ट १९६३ मध्ये अस्तित्वात आला. चार वर्षापूर्वी हा बगीचा चंद्रपूर येथील ख्रिश्चन समाजाच्या लोकांनी खरेदी केला. या बगीचाचे नाव आता कारमेल उद्यान करण्यात आले. या बगीचातील आंब्याचा माल संतोष पोतुला हे घेत आहे. १0 वर्षापूर्वी या बगीचात कलेक्टर आंब्याची १५ झाडे अस्तित्वात होती. आज ६ झाडे राहिलेली आहे. कलेक्टर आंब्यासोबतच या भागातल्या आमरायांमध्ये बैगनपल्ली, सुवर्णरेखा, चेरकुरसम, लालबाग, मलगोबा, निलम, लंगडा, दशेरा, जोनाबुशी हे व इतर गावठी आंबेही आहेत. कलेक्टर जातीचा एक आंबा अर्धा किलो ते अडीच किलोपर्यंत वजनाचा असतो. या आंब्याच्या खरेदीसाठी विदर्भातून तसेच आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातूनही अनेक लोक सिरोंचात येतात. सिरोंचाच्या कलेक्टरचे वैभव राज्याच्या अनेक सनदी अधिकारी व मंत्र्यांनाही आकर्षीत करून घेणारे आहे. सिरोंचाला उन्हाळ्याच्या दिवसात भेट देणारे कलेक्टरची चव चाखल्याशिवाय तेथून जातच नाही. राज्याच्या अनेक मंत्र्यांनीही कलेक्टरच्या रसावर ताव मारल्याचे जुनेजाणते लोक सांगतात. जसा सिरोंचाचा झिंगा प्रसिध्द आहे. तसाच सिरोंचा हा कलेक्टरही राजमान्य आहे.