काेराेना संसर्गाच्या भीतीने लस घेण्यासाठी सरसावले नागरिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST2021-04-10T05:00:00+5:302021-04-10T05:00:28+5:30
जानेवारी महिन्यापासून काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनाच लस दिली जात हाेती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस दिली जात आहे; मात्र रुग्णांची संख्या फारशी जास्त नसल्याने नागरिक लस घेण्यास चालढकल करीत हाेते. आता काेराेना रुग्णांची संख्या वाढल्याने स्वत:च लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.

काेराेना संसर्गाच्या भीतीने लस घेण्यासाठी सरसावले नागरिक
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : मागील महिनाभरापासून जिल्ह्यात काेराेना रुग्णांच्या संख्येत दरदिवशी वाढ हाेत आहे. आपल्यालाही काेराेनाची लागण हाेण्याची भीती नागरिकांमध्ये निर्माण झाली असल्याने लस घेण्यासाठी नागरिक लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेत आहेत. त्यामुळे मागील काही दिवसात लसीकरणाचे प्रमाण वाढत चालले आहे. अंशत: लाॅकडाऊन असतानाही लसीकरणावर परिणाम झालेला नाही.
जानेवारी महिन्यापासून काेराेना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आराेग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांनाच लस दिली जात हाेती. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक व ४५ वर्षे वयावरील नागरिकांना लस दिली जात आहे; मात्र रुग्णांची संख्या फारशी जास्त नसल्याने नागरिक लस घेण्यास चालढकल करीत हाेते. आता काेराेना रुग्णांची संख्या वाढल्याने स्वत:च लस घेण्यासाठी पुढे येत आहेत.
ग्रामीण भागातील नागरिकांचाही प्रतिसाद
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिक काेराेना प्रतिबंधात्मक लस घेण्यास तयार हाेत नव्हते. आपल्या गावापर्यंत काेराेना पाेहाेचणार नाही, असा अंदाज हे नागरिक व्यक्त करीत हाेते. आता मात्र ग्रामीण भागातही काेराेनाचे रूग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे लस घेतलेले बरे, असा विचार करून नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. प्राथमिक आराेग्य केंद्रात लसीकरण केंद्र सुरू झाल्याने ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांसाठी साेयीचे झाले आहे.
काही जिल्ह्यांमध्ये काेराेना प्रतिबंधात्मक लस संपल्याने लसीकरण बंद करण्यात आले हाेते. आपल्याही जिल्ह्यातील लस संपू शकतात, असा अंदाज काही नागरिकांनी बांधला. साठा संपल्यास लस मिळणार नाही, अशी शंका उपस्थित झाल्याने नागरिक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. जिल्ह्यात पुन्हा पाच दिवस पुरेल, एवढा लसीचा साठा उपलब्ध आहे.
प्राथमिक आराेग्य केंद्र स्तरावर लस उपलब्ध झाली आहे. गावाजवळ जवळच केंद्र असल्याने लस घेतली. इतरही ज्येष्ठ नागरिकांनी लस घ्यावी. लस घेतल्यानंतरही स्वत:ला गर्दीपासून दूर ठेवणे गरजेचे आहे.
- हिरामण देवगडे, ज्येष्ठ नागरिक.