सुकमाच्या जंगलात चकमक; १६ नक्षलवादी ठार, जोरदार धुमश्चक्री
By संजय तिपाले | Updated: March 29, 2025 13:57 IST2025-03-29T13:56:11+5:302025-03-29T13:57:18+5:30
जोरदार धुमश्चक्री; मृत नक्षल्यांची संख्या वाढण्याची शक्यता

सुकमाच्या जंगलात चकमक; १६ नक्षलवादी ठार, जोरदार धुमश्चक्री
गडचिरोली : जिल्ह्याच्या सीमेवरील छत्तीसगडमध्ये जवान व माओवाद्यांत जोरदार धुमश्चक्री झाली, यात १६ नक्षल्यांना कंठस्नान घालण्यात जवानांना यश आले. सुकमा जिल्ह्यातील केरलापालच्या जंगलात हा थरार घडला. मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
सुकमा जिल्ह्याच्या केरलापाल जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी गोळा झाल्याची गोपनीय माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. यावरून सुकमा पोलिस दलाचे डीआरजी पथक आणि बिजापूर जवानांनी २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान सुरू केले होते. दरम्यान, २९ मार्चला सकाळी ८ वाजताच्या सुमारास पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक उडाली. यावेळी दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. यात १६ नक्षलवादी ठार झाले. तर दोन डीआरजी जवान जखमी झाले. अजूनही चकमक सुरु असल्याने मृत नक्षलवाद्यांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. घटनास्थळावरून १६ नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्र व दारूगोळा ताब्यात घेण्यात आला आहे. परिसरात नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले आहे.
तीन महिन्यांत १३० नक्षल्यांचा खात्मा
नव्या वर्षांत नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा जवानांनी केलेल्या आक्रमक कारवायांमुळे नक्षलवादी एका राज्यातून दुसऱ्या राज्यात स्थलांतरित होत आहेत. सीमावर्ती भागात बैठकाही घेत आहेत. यावर गुप्तचर यंत्रणेचे लक्ष असून नक्षल्यांच्या अनेक योजना फोल ठरत आहे. तीन महिन्यांत छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भागात झालेल्या विविध चकमकीत १३० पेक्षा अधिक नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले आहे. काही दिवसांपूर्वी जहाल नक्षल नेता मुरलीही ठार झाला होता.
सूक्ष्म नियोजनामुळे नक्षल्यांची पिछेहाट
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी मार्च २०२६ पर्यंत नक्षलवाद संपविण्याची घोषणा केल्यानंतर सद्य स्थितीत छत्तीसगड मध्ये बस्तर फाईटर, सीआरपीएफ, डीआरजी आणि एसटीएफचे जवान संयुक्तपणे नक्षलविरोधी कारवाया पार पाडत आहेत. यामुळे नक्षलवाद्यांची चारही बाजूने कोंडी झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमध्ये नक्षल्यांची दहशत असलेल्या भागांत प्रत्येक ५ किलोमीटर अंतरावर पोलिस ठाणे उभारण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे माओवाद्यांची पिछेहाट झाली आहे.