वनविभागाने धोरण बदलावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:48 IST2019-02-11T00:47:41+5:302019-02-11T00:48:25+5:30
वनविभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात कुप कामे मिळत नाही. परिणामी जंकास संस्था डबघाईस येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनविभागाने आपल्या धोरणात बदल न केल्यास जंकास संस्थांच्या विकासासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी खा. मारोतराव कोवासे यांनी केले.

वनविभागाने धोरण बदलावे
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वनविभागाच्या धोरणामुळे जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांना पुरेशा प्रमाणात कुप कामे मिळत नाही. परिणामी जंकास संस्था डबघाईस येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे वनविभागाने आपल्या धोरणात बदल न केल्यास जंकास संस्थांच्या विकासासाठी प्रसंगी आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा जंगल कामगार सहकारी संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी खा. मारोतराव कोवासे यांनी केले.
गडचिरोली जंगल कामगार सहकारी संस्थेच्या आवारात रविवारी जिल्ह्यातील जंगल कामगार सहकारी संस्थांच्या कुप कामाबाबत व अन्य अडचणीवर चर्चा करणे व त्यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यासाठी मेळावा घेण्यात आला. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख अतिथी म्हणून राज्य जंगल कामगार सहकारी संघाचे संचालक घनश्याम मडावी, जिल्हा संघाचे माजी संचालक शालीकराम गेडाम उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना घनश्याम मडावी म्हणाले, यापूर्वी वनविभागाने जंकास संस्थांचे कार्यक्षेत्र असलेले जंगल वनविकास महामंडळास हस्तांतर केले. आता कार्यक्षेत्राबाहेरील कामे प्राथमिक संस्थांना देण्यात येणार नाहीत, असे परिपत्रक काढले. यामुळे जंकास संस्थांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वनविभागाच्या मार्गदर्शनाखालीच जंकास संस्था कुप कामे करतात. कुप कामे केल्यानंतर मिळणाऱ्या अल्प मोबदल्यात जंकास संस्था तग धरून आहेत. मात्र अधिकाºयांच्या जंकास संस्थाविरोधी धोरणामुळे जंकास संस्थांच्या पदाधिकारी व सभासदांनी आपसातील मतभेद विसरून एकत्र येण्याची गरज आहे.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक जिल्हा संघाचे पर्यवेक्षक एम. डी. मेश्राम तर आभार जंकास संस्थेचे सचिव एम. डी. मुंडले यांनी मानले. यावेळी आनंदराव कोवासे, रामदास सुरपाम, विजय सेडमाके, जगन्नाथ सेडमाके, पांडुरंग मडावी, तुळशीराम मडावी, केशरी हिचामी, श्रीराम मानकर व पदाधिकारी उपस्थित होते.
कुपांसाठी पाठपुरावा करणार
२०१८-१९ या वर्षात जंकास संस्थांना मोजकीच कुपकामे मिळाली. आता अपर प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी २३ जानेवारी २०१९ रोजी परिपत्रक काढून प्राथमिक संस्थांना कार्यक्षेत्राबाहेरील कुपकामे मिळणार नाहीत, असे कळविले. यासाठी त्यांची भेट घेऊन वस्तूस्थिती मांडण्याचेही याप्रसंगी ठरविण्यात आले.