कालवा फुटल्याने पीक धोक्यात

By Admin | Updated: August 30, 2014 01:25 IST2014-08-30T01:25:27+5:302014-08-30T01:25:27+5:30

तालुक्यातील गोगाव- अडपल्ली येथील उपसा जलसिंचन योजनेचा कालवा मागील अनेक दिवसांपासून फुटला आहे. मात्र सदर कालवा दुरूस्त करण्याकडे

Causing the canal crop hazard | कालवा फुटल्याने पीक धोक्यात

कालवा फुटल्याने पीक धोक्यात

गडचिरोली : तालुक्यातील गोगाव- अडपल्ली येथील उपसा जलसिंचन योजनेचा कालवा मागील अनेक दिवसांपासून फुटला आहे. मात्र सदर कालवा दुरूस्त करण्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष झाले असल्याने शेकडो एकरातील धानपीक धोक्यात आले. सदर कालवा तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.
अडपल्ली व गोगाव येथील शेतीला जलसिंचनाची सुविधा निर्माण व्हावी यासाठी पाटबंधारे विभागाने वैनगंगा नदीवर उपसा जलसिंचन योजनेचे १० वर्षापूर्वीच बांधकाम केले. मात्र सदर योजनेत बिघाड निर्माण झाल्याने सुमारे ६ ते ७ वर्ष सदर योजना बंद होती. योजना सुरू करण्यात यावी यासाठी शेतकऱ्यांनी अनेक वेळा आंदोलने, निवेदन दिल्यानंतर योजनेतील बिघाड दुरूस्त करून योजना चार वर्षापूर्वी सुरू करण्यात आली. तेव्हापासून या योजनेचे पाणी हजारो हेक्टर शेतीला पुरविले जात आहे.
जलसिंचन योजनेच्या चौथ्या क्रमांकाच्या कालव्याला पंढरी मंगर यांच्या शेताजवळ भलेमोठे भगदाड पडले आहे. सदर कालवा या ठिकाणी ३ वर्षापूर्वीच फुटला होता. तेव्हापासून शेतकऱ्यांना पाण्याचा कमी पुरवठा होत असल्याने कालवा दुरूस्त करण्याची मागणी केली जात होती. मात्र पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केले. यावर्षीच्या पावसाळ्यातून या भगदाडातून जास्तच पाणी वाहायला लागले. तरीही पाटबंधारे विभागाने कालव्याची दुरूस्ती केली नाही. २७ आॅगस्ट रोजी या ठिकाणी मोठा भगदाड पडल्याने कालव्यातील पूर्ण पाणी बाजूला वाहून जात आहे. मागील एक महिन्यापासून पावसाने दडी मारली असल्याने शेतीला पाणी देणे आवश्यक झाले आहे. मात्र पाणीच मिळत नसल्याने पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाविषयी रोष व्यक्त केला आहे. आणखी काही दिवस सदर कालवा दुरूस्त न करण्यात आल्यास शेकडो हेक्टरातील धानपीक धोक्यात येण्याची शक्यता आहे.
उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्याचा उपयोग सिंचनासाठी करणाऱ्या शेतकऱ्यांकडून वार्षिक पाणसारा वसूल केला जातो. पाणसाऱ्याचे लाखो रूपये पाटबंधारे विभागाकडे गोळा होतात. या रक्कमेतून उपसा सिंचन योजनेची देखभाल करणे सहज शक्य आहे. तरीही पाटबंधारे विभागाचे कर्मचारी याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सदर कालवा तत्काळ दुरूस्त करण्यात यावा, अशी मागणी दुधराम म्हशाखेत्री, उमाकांत चौधरी, दिनकर चौधरी, बाळकृष्ण म्हशाखेत्री, मधुकर चौधरी, भक्तदास चौधरी, अनिल म्हशाखेत्री, निलकंठ भोयर, केशव भोयर, दिवाकर म्हशाखेत्री, सोमा खेवले, खुशाल खेवले, मधु पांडव आदी शेतकऱ्यांनी केली आहे. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Causing the canal crop hazard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.