वाघाच्या हल्ल्यात गुरे चारणाऱ्याचा मृत्यू, आरमोरी तालुक्यातील घटना; दहा महिन्यांत १६ वा बळी

By गेापाल लाजुरकर | Published: October 7, 2022 09:11 PM2022-10-07T21:11:54+5:302022-10-07T21:12:35+5:30

ठेमाजी आत्राम हे नेहमीप्रमाणे ७-८ सहकाऱ्यांसाेबत आपापली गुरे चराईसाठी कुरंझा परिसरातील जंगलात सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गेले होते.

Cattle herdsman dies in tiger attack, incident in Armori taluka; 16th victim in ten months | वाघाच्या हल्ल्यात गुरे चारणाऱ्याचा मृत्यू, आरमोरी तालुक्यातील घटना; दहा महिन्यांत १६ वा बळी

वाघाच्या हल्ल्यात गुरे चारणाऱ्याचा मृत्यू, आरमोरी तालुक्यातील घटना; दहा महिन्यांत १६ वा बळी

Next

गडचिरोली - गावापासून अगदी ३ किमी अंतरावरील जंगलात स्वमालकीची गुरे चारणाऱ्या इसमावर वाघाने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना शुक्रवार ७ ऑक्टाेबर राेजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. गेल्या दहा महिन्यात वाघाने घेतलेला हा १६ वा बळी आहे.

ठेमाजी माधव आत्राम (५५) रा. देशपूर ता. आरमाेरी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या गुराख्याचे नाव आहे. ठेमाजी आत्राम हे नेहमीप्रमाणे ७-८ सहकाऱ्यांसाेबत आपापली गुरे चराईसाठी कुरंझा परिसरातील जंगलात सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गेले होते. हा परिसर झुडपी जंगलयुक्त असून याच भागातून पाल नदी वाहते. सर्वजण चहुबाजूंनी उभे राहून आपापली गुरे राखत हाेते. दुपारी ३ वाजताच्या सुमारास ठेमाजी आत्राम हे सहकाऱ्यांना दिसेनाशे झाले. याचवेळी सहकाऱ्यांनी एकमेकांना आवाज दिला; परंतु ठेमाजी यांनी प्रतिसाद दिला नाही. 

तेव्हा वाघाचा हल्ला झाला असावा, अशी शंका सहकाऱ्यांच्या मनात आली. त्यांनी गावात याबाबत माहिती दिली. तेव्हा गावातील नागरिक माेठ्या संख्येने जंगलाच्या दिशेने आले. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांनाही कळविले. त्यानंतर दुपारपासून जंगलात शाेधमाेहीम राबविण्यात आली. शेवटी सायंकाळी ५:४५ वाजताच्या सुमारास ठेमाजी आत्राम यांचा मृतदेह सापडला. वाघाने त्यांच्यावर हल्ला करून त्यांना ठार केले हाेते.

गुरे चारण्यासाठी गुराखी मिळेना
देशपूरलगतच्या कुरंझा येथील एका गुराख्याला याच वर्षी २० जानेवारी राेजी वाघाने ठार केले हाेते. तेव्हापासून गुरे चराईसाठी गुराखी मिळेनासा झाला. त्यामुळे प्रत्येक पशुपालक आपापली गुरे शेतशिवारात चराईसाठी नेतात. अनेकजण शेतशिवारात गुरे राखतात तर काहीजण समुहाने जंगलालगत गुरे नेतात. तरीसुद्धा वाघाचे हल्ले सुरूच आहेत. विशेष म्हणजे, कुरंझासह परिसरातील यावर्षीची ही दुसरी घटना आहे.
 

Web Title: Cattle herdsman dies in tiger attack, incident in Armori taluka; 16th victim in ten months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.