सोशल मीडियाचा गैरवापर करणाऱ्या जिल्ह्यातील ८ जणांवर गुन्हे दाखल; आक्षेपार्ह पोस्ट करणे पडेल महागात !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2025 17:16 IST2025-03-29T17:15:47+5:302025-03-29T17:16:27+5:30
वापर काळजीपूर्वक हवा : नागपूर दंगलीनंतर सायबर सेलची करडी नजर

Cases registered against 8 people in the district for misusing social media; Posting objectionable content will be costly!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नागपूर येथे औरंगजेबाच्या कबरीच्या वादातून मोठी दंगल झाली होती. ही दंगल होण्यामागे सोशल मीडियावर टाकण्यात आलेल्या वादग्रस्त पोस्ट कारणीभूत ठरल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. त्यामुळे राज्यभरातील पोलिसांनी आता सोशल मीडियावरील पोस्टवर वॉच ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात गडचिरोली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या जवळपास ८ जणांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून दोष सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयात सोशल मीडियावर वॉच ठेवण्यासाठी सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलची स्थापना करण्यात आली आहे. या सेलद्वारे फेसबुक, व्हॉटसअॅप द्विटर, इन्स्टाग्राम अकाऊंटवर लक्ष ठेवण्यात येत आहे. वादग्रस्त पोस्ट आढळल्यास लगेच ती डिलीट केली जात आहे. जिल्ह्याच्या शहरी भागात इन्स्टाग्राम, फेसबूक व द्विटरचा उपयोग करणाऱ्या युवकांची संख्या अलिकडे बरीच वाढली आहे. त्यामुळे युवकांनी सावधगिरी बाळगत याचा वापर करणे गरजेचे आहे.
हातात शस्त्रे घेऊन फोटो, रील्स होतात अपलोड
सोशल मीडियावर तरुण अॅक्टिव्ह झाले आहेत. अनेकजण हातात खंजर, तलवार आणि देशी कट्टे घेऊन फोटो आणि रूल्स तयार करतात. त्यानंतर एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे या रील्स सोशल मीडियावर टाकण्यात येतात. अशा प्रकारे त्या त्या भागात आपली किती दहशत आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात येतो; परंतु पोलिसांनी आता अशा प्रकारचे दहशतीचे व्हिडीओ आणि रील्स टाकणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.
कुरखेडात पोलिसांनी दिली होती समज
सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह मजकूर टाकणाऱ्या कुरखेडा शहरातील युवकांना पोलिसांनी काही दिवसांपूर्वी समज दिली होती. दोन समाजात तेढ निर्माण होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आला.
१९ इन्स्टाग्राम, फेसबुक अकाऊंटची तपासणी
सोशल मीडिया मॉनिटरिंग सेलने आतापर्यंत जवळपास १९ इन्स्टाग्राम व फेसबुक अकाऊंटवर वादग्रस्त पोस्ट टाकल्याचे उघडकीस आले असून त्याची तपासणी केली जात आहे. या सर्व पोस्ट टाकणाऱ्या इन्स्टाग्राम अकाऊंट चालकांवर पोलिसांत गुन्हे नोंदवितात.
"सोशल मीडियाचा वापर करताना प्रत्येकाने खबरदारी बाळगण्याची गरज आहे. दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशा पोस्ट अपलोड करू नये."
- महेंद्र वाघ, पोलिस निरीक्षक, कुरखेडा.
"सध्याच्या तरुणाईसाठी सोशल मीडिया ही अत्यावश्यक बाब बनली आहे. इतरांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत, हे दाखविण्याच्या मानसिकतेतून असे प्रकार होत आहेत. मात्र, सोशल मीडियाचा वापर कमी केला पाहिजे."
- डॉ. सचिन हेमके, मानसिक रोगतज्ज्ञ.