कार नाल्यात कोसळली, दोघे बचावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 05:00 IST2020-09-07T05:00:00+5:302020-09-07T05:00:32+5:30
कार रस्त्याच्या खाली उतरून सरळ नाल्यात गेली. यावेळी नाल्यात १० फूट पाणी होते. कार चालकाच्या बाजूचा अर्धा काच खुला असल्याने कार चालक व मालक दादाजी फुलझेले स्वत: कारच्या बाहेर निघून आपल्या सोबत असलेल्या पत्नीला पाण्याखाली सापडलेल्या कारमधून बाहेर काढले. स्वत:चे व पत्नीचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. नशिब बलवत्तर असल्याने एवढा मोठा अपघात होऊनही पती-पत्नी सुखरूप बचावले.

कार नाल्यात कोसळली, दोघे बचावले
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : चंद्रपूरच्या जिल्ह्याच्या नागभिडवरून चामोर्शी मार्गे अहेरीला जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अनखोडा गावानजीक नाल्यात कार कोसळली. मात्र सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही. १० फूट पाणी असलेल्या नाल्यात पडूनही जीवितहानी न झाल्याने फुलझेले कुटुंबियांना ‘देव तारी त्याला कोण मारी’ याचा प्रत्यय आला.
नागभिड येथील रहिवासी दादाजी कारूजी फुलझेले हे पत्नी शेवंताबाईला घेऊन एमएच ४९ एई २३३८ क्रमांकाच्या कारने चामोर्शी मार्गे अहेरीकडे जात होते. मुलगी व जावयांना भेटायला कारने जात असताना अनखोडा गावानजीकच्या नाल्याजवळ त्यांना भ्रमणध्वनी आला. भ्रमणध्वनीला प्रतिसाद देण्याचा प्रयत्न करताना वाहनावरील नियंत्रण सुटले.
परिणामी कार रस्त्याच्या खाली उतरून सरळ नाल्यात गेली. यावेळी नाल्यात १० फूट पाणी होते. कार चालकाच्या बाजूचा अर्धा काच खुला असल्याने कार चालक व मालक दादाजी फुलझेले स्वत: कारच्या बाहेर निघून आपल्या सोबत असलेल्या पत्नीला पाण्याखाली सापडलेल्या कारमधून बाहेर काढले. स्वत:चे व पत्नीचे प्राण वाचविण्यात त्यांना यश आले. नशिब बलवत्तर असल्याने एवढा मोठा अपघात होऊनही पती-पत्नी सुखरूप बचावले. नागरिकांच्या मदतीने पत्नीला आष्टी ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.
या अपघाताची माहिती मिळताच आष्टी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मदतकार्य सुरू केले. दुपारी १२ वाजता क्रेन बोलवून अपघातग्रस्त कार नाल्यातून बाहेर काढले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरिक्षक धर्मेंद्र मडावी, पोलीस उपनिरिक्षक जयदीप पाटील, ए. एस. गोंगले, पोलीस हवालदार रामटेके, शिपाई राजू पंचपुलीवार, बालाजी येलकुचीवार आदी करीत आहेत. शेवंताबाई फुलझेले यांच्या कंबरेला मार लागला असल्याने त्याने चंद्रपूरच्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे.