लालडोंगरी मार्गावरील नहराचा पूल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:38 AM2021-05-19T04:38:08+5:302021-05-19T04:38:08+5:30

चामोर्शी : चामोर्शी -लालडोंगरी मार्गावर नहराचा मायनर आहे. त्याला ओलांडून जाण्यासाठी ५० वर्षांपूर्वी अरुंद पूल बांधकाम करण्यात आले आहे. ...

The canal bridge on Laldongri road is dangerous | लालडोंगरी मार्गावरील नहराचा पूल धोकादायक

लालडोंगरी मार्गावरील नहराचा पूल धोकादायक

Next

चामोर्शी : चामोर्शी -लालडोंगरी मार्गावर नहराचा मायनर आहे. त्याला ओलांडून जाण्यासाठी ५० वर्षांपूर्वी अरुंद पूल बांधकाम करण्यात आले आहे. या पुलावरून दररोज दुचाकी व अन्य वाहनांची वर्दळ असते. पूल सध्या जीर्णावस्थेत असून त्याला संरक्षक कठडे नाहीत. असे असतानाही नागरिक या पुलावरून ये - जा करीत असतात. अनेकदा या पुलावर किरकोळ अपघातसुद्धा घडले आहेत. या परिसरात मोठ्या प्रमाणात शेती आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष देऊन या नहरावरील मायनरची उंची वाढवावी व रुंद पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सुरगावातील समाज मंदिरांची दुरवस्था

मुलचेरा : तालुक्यातील वेंगनूर ग्रा.पं.अंतर्गत सुरगाव व अडंगेपल्ली येथे समाज मंदिराच्या इमारतीचे आमदार निधीतून बांधकाम करण्यात आले. या समाज मंदिराच्या देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने इमारतींची दैनावस्था झाली आहे. या इमारतींवर लाखो रुपयांचा खर्च होऊनही त्या निकामी झाल्या आहेत. मुलचेरा खासगी व सार्वजनिक कार्यक्रम करण्याच्या उद्देशाने इमारती बांधण्यात आल्या. या इमारतींची देखभाल व दुरुस्ती करण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची आहे. मात्र, ग्रामपंचायतीचे याकडे दुर्लक्ष झाले आहे. खिडक्या, दरवाजे, तावदान तुटले आहेत. गावातील मोकाट जनावरांच्या आश्रयाचे ठिकाण बनले आहेत. सुरगाव व अडंगेपल्ली ही दोन्ही गावे येतात. सदर दोन्ही गावांतील समाज मंदिरांची दुरुस्ती ग्रा.पं. निधीतून करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत

गडचिराेली : आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनचे आधारभूत उन्हाळी धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू न झाल्याने नाेंदणीकृत शेतकरी धान विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. ३१ जूनपर्यंतच उन्हाळी धान खरेदी केली जाते; परंतु उद्यापही आधारभूत धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी केंद्र सुरू हाेण्याच्या प्रतीक्षेत आहेत.

झिंगानूर परिसरातील शेती बेभरवशाची

झिंगानूर : झिंगानूर हा आदिवासी बहुल क्षेत्र आहे. या भागात रोजगाराचे कोणतेही साधन उपलब्ध नाही. त्यामुळे शेतीवरच उपजीविका करावी लागते. मात्र, सिंचनअभावी शेतीसुद्धा साथ देत नाही. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना दारिद्र्यात जीवन जगावे लागते. सिरोंचा तालुक्यात पाणीपातळी अधिक आहे. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना बोअरवेल किंवा विहीर देण्याची मागणी आहे. तालुक्यात धान पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या परिसरात सिंचनाची सुविधा उपलब्ध नाही. या भागातील बहुतांश लोकांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र, सिंचनाची सुविधा नसल्याने शेती बेभरवशाची झाली आहे.

विजेविना अंगणवाड्यांतील साहित्य पडले धूळखात

काेरची : प्रत्येक गावात अंगणवाड्या निर्माण करण्यात आल्या आहेत. एवढेच नाही तर शहरातील प्रत्येक वॉर्डात दोन ते तीन अंगणवाड्या आहेत. मात्र, काही अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. जिल्हा परिषदेने अंगणवाड्यांना वीजपुरवठा करून दिला. मात्र, वीज बिल भरणार कोण? हे निश्चित झाले नाही. ग्रामपंचायतीनेही हात वर केले. त्यामुळे अंगणवाडीचे वीज बिल भरले नाही. परिणामी, अनेक ठिकाणच्या अंगणवाड्यांचा वीजपुरवठा अल्प कालावधीतच कपात करण्यात आला.

वेलगूर येथे पक्क्या रस्त्यांचे बांधकाम करा

कमलापूर : अहेरी तालुक्याच्या दामरंचा ग्रामपंचायतींतर्गत येत असलेल्या वेलगूर येथे अद्यापही अंतर्गत पक्के रस्ते बांधण्यात आले नाहीत. वेलगूर येथील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून नागरिकांकडून प्रशासनाकडे केली जात आहे. वेलगूर परिसरातील अनेक गावांत अद्यापही अंतर्गत रस्त्यांचे पक्के बांधकाम करण्यात आले नाही. पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागत आहे.

बोगस कापूस बियाण्यांपासून सावध राहावे

अहेरी : तालुक्यात मागील काही वर्षांपासून कापूस पिकाचा पेरा वाढत असून शेतकरी आता नगदी पीक म्हणून कापूस पिकाकडे पाहत आहेत; परंतु शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेत काही कंपन्या बनावट बियाणे तयार करून त्याची परस्पर विक्री शेतकऱ्यांना करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाेगस बियाण्यांपासून सावध राहावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सदर बियाण्यांमुळे व तणनाशकांचा वापर यामुळे जमिनीचा पोत खालावतो. तसेच मानवाला दुर्धर आजार हाेण्याची शक्यता आहे.

धानोरा शहरात अत्यल्प पाणीपुरवठा

धानोरा : मे महिना सुरू असल्याने कडक ऊन तापत आहे. तापमान वाढत असून लाकडाऊनमुळे नागरिक घरी राहत असल्याने कूलरचा वापर वाढल्याने पाणी अधिक प्रमाणात लागत आहे, तसेच अनेक विहिरींची पाण्याची पातळी खोलात गेली आहे. अनेक प्रभागांत विहिरी आटल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. मोजक्याच प्रभागात नगर पंचायतीद्वारे पाण्याचे टँकर सुरू आहेत. इतर प्रभागातील नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: The canal bridge on Laldongri road is dangerous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.