बंधारा, शेततळे काम निकृष्ट
By Admin | Updated: June 25, 2014 23:46 IST2014-06-25T23:46:29+5:302014-06-25T23:46:29+5:30
कृषी विभागाच्यावतीने सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी नाल्यामध्ये सिमेंट-काँक्रीट बंधाऱ्याचे काम जिल्हाभरात हाती घेण्यात आले. मात्र अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने सिंचन क्षेत्र

बंधारा, शेततळे काम निकृष्ट
सिरोंचा : कृषी विभागाच्यावतीने सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी नाल्यामध्ये सिमेंट-काँक्रीट बंधाऱ्याचे काम जिल्हाभरात हाती घेण्यात आले. मात्र अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असल्याने सिंचन क्षेत्र वाढण्याचे चिन्ह दिसत नाही. यामुळे सिमेंट-काँक्रिट बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सिरोंचा या दुर्गम तालुक्यातील गुम्मलकोंडा या गावी नाल्यामध्ये सिमेंट-काँक्रिटचे बंधारे बांधण्यात आले. कृषी विभागाने या गावात एकाच नाल्यावर ३०० मिटरच्या अंतरावर ६ सिमेंट-काँक्रिटचे बंधारे बांधले. मात्र सदर काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप करीत शेतकऱ्याची फसवणूक झाली आहे, असे मनसेचे अहेरी विधानसभा क्षेत्र प्रमुख आनंद दहागावकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
निकृष्ट बांधकाम झाल्यामुळे पावसाळ्यात सदर बंधारे तग धरू शकणार नाहीत. यामुुळे पाणी साठवणूक करता येणार नाही. परिणामी गरजेच्यावेळी शेतीला पाणी देणे कठीण होईल. यामुळे कृषी विभागाने बांधलेल्या सिमेंट-काँक्रिट बंधाऱ्याच्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी आनंद दहागावकर यांनी निवेदनातून केली आहे. याच तालुक्यात मु ळीगट्टा परिसरात कृषी विभागाच्यावतीने शेततळ्याचे काम करण्यात आले. मात्र हेही काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असा आरोप आनंद दहागावकर यांनी केला आहे. असेच चित्र बाराही तालुक्यात असल्याचे दिसून येते. यामुळे कृषी विभागाच्या या योजनांचा शेतकऱ्यांसाठी लाभ होणार नसल्याचे स्पष्ट दिसते. याची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेण्याची मागणी होत आहे.