बंधाऱ्याची योजना रखडली
By Admin | Updated: August 23, 2014 01:50 IST2014-08-23T01:50:22+5:302014-08-23T01:50:22+5:30
गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याची योजना तयार करून शेती सिंचनाची व्यवस्था निर्माण करावी ही योजना राज्य सरकारने राबविण्याचे ठरविले होते.

बंधाऱ्याची योजना रखडली
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या वैनगंगा नदीवर विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याची योजना तयार करून शेती सिंचनाची व्यवस्था निर्माण करावी ही योजना राज्य सरकारने राबविण्याचे ठरविले होते. या योजनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात पाच ठिकाणी पूल कम बंधारे बांधले जाणार होते. मात्र सध्या चामोर्शी तालुक्यातील चिचडोह बॅरेज या एकमेव लघु सिंचन प्रकल्पाचे काम सुरू आहे, अन्य योजनांसाठी शासनाने कवडीचाही निधी दिलेला नाही. गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदी जवळजवळ दीडशे किलोमीटरच्या परिघातून जाते. या नदीवर प्रत्येक १० किमी अंतरावर बंधारा बांधावा या माध्यमातून शेती सिंचनाची सुविधा निर्माण होईल. तसेच उद्योग धंद्यानाही पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देता येईल, अशी योजना तयार करण्यात आली होती. राज्य सरकारने तत्कालीन आमदार विद्यमान खासदार अशोक नेते सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना घेऊन आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे तेथील बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी सरकारी सूचनेनंतर गेले होते. विधानसभेतही विजयवाडा पॅटर्न बंधाऱ्याच्या योजनेवर चर्चा होऊन या योजनेला मूर्तरूप देण्याची तयारी सरकारने केली होती. त्यानंतर राज्यातील आघाडी सरकारने वैनगंगा नदीवर बंधारे बांधण्याच्या योजनेला मंजुरी दिली. उपसा सिंचन योजना सुरू करण्याला सरकारने मंजुरी दिली. त्यानंतर चामोर्शी तालुक्यात चिचडोह बॅरेज प्र्रकल्पाचे काम सुरू करण्यात आले. या प्रकल्पाचे काम आता पूर्णत्वास येत आहे. राज्यपाल महोदयांनीही काही महिन्यांपूर्वी या कामाची पाहणी केली होती. मात्र यासोबत इतर चार योजनांनाही मंजुरी देण्यात आली होती. त्यापैकी एकाही योजनेचे काम अद्याप सुरू झालेले नाही. यामध्ये गडचिरोली तालुक्यात कोटगल, आरमोरी तालुक्यातील डोंगरगाव, ठाणेगाव, अहेरी तालुक्यातील महागाव आदी प्रकल्पाचा समावेश होता. या संदर्भात अलीकडेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विचारणा केली असता, राज्याचे माजी जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी राज्यपालाच्या सूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात या योजनांसाठी मंजुरी देण्यात आली. लवकरच यांना निधीही उपलब्ध होईल. आपल्या कार्यकाळातच हे काम झाले आहे, असे सांगून वेळ मारून नेली. उपमुख्यमंत्र्यांनी विदर्भाला सिंचनासाठी मोठा निधी देण्यात आला, असाही दावा केला. मात्र प्रत्यक्षात चिचडोह बॅरेजशिवाय एकाही प्रकल्पाचे काम अद्याप सुरू नाही. या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून मोठ्या निधीची तरतूद होणे आवश्यक आहे. (जिल्हा प्रतिनिधी)