बोडेना जंगल परिसरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:03+5:302021-04-24T04:37:03+5:30
बोडेना गावातील रहिवासी रमेश नांगसाय हलामी हे २१ एप्रिल राेजी बुधवारी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात आले होते. त्यांना दुपारच्या सुमारास ...

बोडेना जंगल परिसरात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह
बोडेना गावातील रहिवासी रमेश नांगसाय हलामी हे २१ एप्रिल राेजी बुधवारी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात आले होते. त्यांना दुपारच्या सुमारास एक अनोळखी व्यक्ती जांभळाच्या झाडाखाली बेशुद्धावस्थेत दिसून आल्याने त्यांनी गावचे पोलीस पाटील सुमेनसिंह अंजोरसिंग मडावी यांना ही माहिती दिली. ते आपल्यासोबत चार- पाच लोक घेऊन घटनास्थळी आले.
सदर व्यक्ती अंदाजे ३५ ते ४० वर्षे वयोगटातील असून, बांधा सडपातळ, उंची पाच फूट पाच इंच, रंग सावळा, अंगावर कोणतेही कपडे नसून, फक्त एक काळ्या रंगाची हाफ पॅन्ट घातलेला होता. तो इसम जिवंत असल्याने पोलीस पाटलाने रुग्णवाहिका बोलावून दुपारून २ वाजेच्या सुमारास तेथील लोकांच्या मदतीने त्या इसमास रुग्णवाहिकेने उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय कोरची येथे आणले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. याबाबत पोलीस पाटील सुमेनसिंग अंजोरीसिंग मडावी यांच्या रिपोर्टवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.
सदर अनोळखी प्रेताची ओळख अद्याप पटली नसून, त्याचा शोध कोरची पोलिसांकडून सुरू आहे. या अनोळखी इसमाबाबत काहीही माहिती मिळून आल्यास पोलीस स्टेशनला संपर्क करावा, असे आवाहन कोरचीचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल सूर्यवंशी यांनी केले आहे.