नव्या खासदारांवर अपेक्षांचे मोठे ओझे
By Admin | Updated: June 28, 2014 00:49 IST2014-06-28T00:49:04+5:302014-06-28T00:49:04+5:30
चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे नवे खासदार निवडून आले आहे. त्यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहे.

नव्या खासदारांवर अपेक्षांचे मोठे ओझे
रत्नाकर बोमिडवार चामोर्शी
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रात भाजपचे नवे खासदार निवडून आले आहे. त्यांच्याकडून जनतेला मोठ्या अपेक्षा आहे. त्यामुळे त्यांच्यावर अपेक्षांच्या ओझाचा अधिक भार आहे.
चामोर्शी तालुक्याच्या निर्मितीपासून सत्तारूढ पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सातत्याने विकासाकडे दुर्लक्ष केले. केंद्र शासनाच्याच नाही तर राज्य शासनाच्याही विविध योजनांची अंमलबजावणी या तालुक्यात होऊ शकली नाही. चामोर्शी येथे एसटी आगार, बसस्थानक, तालुका क्रीडा प्रबोधिनी, उपजिल्हा रूग्णालय, तालुका न्यायालय या योजना ३३ वर्षानंतरही कागदावरच आहेत. २५ वर्षानंतर येथे न्यायालय सुरू झाले. परंतु न्यायालयाला अद्याप इमारत मिळालेली नाही. एमआयडीसीचा पत्ता नाही. कोणताही उद्योग नसल्याने तालुक्याच्या गावागावात बेरोजगारांच्या फौजा निर्माण झाल्या आहे. लोकप्रतिनिधीने येथे उद्योग सुरू करण्याबाबत कधीही प्रयत्न केले नाही. पर्यटन उद्योग व जंगलावर आधारीत उद्योगांना येथे मोठी संधी आहे. अशोक नेते आमदार असतांना वडसा ते गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी त्यांनी प्रयत्न केले होते. नंतरच्या पाच वर्षात शासनाच्या व लोकप्रतिनिधीच्या नाकर्ते कारभारामुळे गडचिरोलीपर्यंत रेल्वे येऊ शकलेली नाही.
चामोर्शी ते मुल मार्ग रेल्वे नेण्यासाठी नव्या खासदारांनी या पाच वर्षात प्रयत्न करावे, अशी तालुकावासीयांची अपेक्षा आहे. दक्षिणेची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्र्कंडेश्वराच्या विकासासाठीही केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न व्हायला हवा. तसेच खनिज संपत्तीवर आधारीत मोठा उद्योग चामोर्शीत केंद्र सरकारच्या पुढाकारातून उभा राहण्याची गरज आहे. चामोर्शी तालुक्यात मोठ्या नद्यांवर सिंचन प्रकल्प उभे राहिल्यास नागरिकांची सोय होईल. त्यामुळे येत्या पाच वर्षात खासदारांनी चामोर्शीच्या विकासासाठी मोठे प्रयत्न करावेत.