बनावट ॲपद्वारे आयपीएलवर सट्टा, चार एजंट ताब्यात
By संजय तिपाले | Updated: April 29, 2024 12:58 IST2024-04-29T12:55:48+5:302024-04-29T12:58:38+5:30
अहेरीत पोलिसांची कारवाई : १० जणांवर गुन्हा दाखल

Betting on IPL through fake app, four agents arrested
गडचिरोली : सध्या आयपीएलचा सीजन सुरु असून बनावट ॲपद्वारे सट्टा खेळविणाऱ्या चार एजंटांना पोलिसांनी २७ एप्रिल रोजी सापळा रचून पकडले. मोठे रॅकेट उघडकीस आले असून १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
निखिल दुर्गे, आसिफ शेख, इरफान शेख (तिघे रा. अहेरी), संदीप गुडपवार ( रा. नागेपल्ली) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून चार मोबाईल व रोख ९ हजार ४२० रुपये असा मुद्देमाल जप्त केला. या चौघांसह निखील गुंडावार, प्रणित श्रीरामवार, अक्षय गनमुकलवार, फरमान शेख, फरदिन पठाण, धनंजय गोगीवार हे सुध्दा एजंट म्हणून काम करत असल्याची माहिती उजेडात आली. या सर्वांवर महाराष्ट्र जुगार बंदी कायदा कलम ४ व ५ कायद्यान्वये गुन्हा नोंंद करण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अहेरीचे अपर अधीक्षक अहेरी एम. रमेश, उपअधीक्षक अजय कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दशरथ वाघमोडे, उपनिरीक्षक जनार्धन काळे व सहकाऱ्यांनी केली.
गेस्ट हाऊसमधून चालायचे रॅकेट
अहेरी येथील बालाजी गेस्ट हाऊस येथून हे रॅकेट चालत असे. तेथे छापा मारला असता, बनावटी अॅप nice.7777.fun या प्लॅटफार्मवर ऑनलाईन आय.पी.एल क्रिकेट सट्टयाचा खेळ खेळून व इतर लोकांना त्यावर पैसे लावून खेळ खेळवित असल्याचे दिसून आले.