बायोमेट्रिकने उडविली आश्रमशाळांची झोप
By Admin | Updated: October 11, 2014 01:39 IST2014-10-11T01:39:28+5:302014-10-11T01:39:28+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक मशीन लावण्यात आल्या आहेत.

बायोमेट्रिकने उडविली आश्रमशाळांची झोप
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत येणाऱ्या सर्वच आश्रमशाळांमध्ये बायोमेट्रिक मशीन लावण्यात आल्या आहेत. या मशीनवरच प्रत्येक विद्यार्थ्याची हजेरी लावल्या जाते. यामुळे आश्रमशाळांमधील भ्रष्टाचाराला आळा बसण्यास फार मोठी मदत होणार आहे. दुसरीकडे काही विद्यार्थी बायोमेट्रिक मशीनवर हजेरीच लावत नसल्याने आश्रमशाळा कर्मचारी व संस्थाप्रमुखांच्या अडचणी वाढल्या आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात तीनही प्रकल्पांमध्ये एकुण ९३ अनुदानित व शासकीय आश्रमशाळा आहेत. अनुदानित आश्रमशाळांना विद्यार्थ्यांची संख्या व त्यांची उपस्थिती यांच्यानुसार अनुदान दिले जाते. जास्तीत जास्त अनुदान शासनाकडून लाटता यावे, यासाठी संस्थाप्रमुख हजेरी पटावर बोगस विद्यार्थी दाखवून लाखो रूपये अनुदान उचलत होते. ही बाब आदिवासी विकास विभागाच्या लक्षात आली. त्यानंतर राज्यातील सर्वच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची हजेरी घेण्यासाठी प्रत्येक शाळेला दोन बायोमेट्रिक मशीन देण्यात आल्या. सदर मशीन जुलै महिन्यातच कार्यान्वित करण्यात आल्या.
सकाळी ७ ते ९ व सायंकाळी ६ ते ८ या सुमारास बायोमेट्रिक मशीनवर हजेरी लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. बहुतांश आश्रमशाळेमध्ये १ मे १२ पर्यंतचे वर्ग आहेत. प्रत्येक आश्रमशाळेमध्ये जवळपास ५०० ते ५५० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी केवळ दोनच मशिन देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांची हजेरी लावण्यासाठी एकच गर्दी उसळते. खेळण्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या अंगठ्यांना घाम लागला असतो. त्यामुळे मशिन हजेरीची नोंद करीत नाही. यामध्ये एका विद्यार्थ्याची हजेरी लावण्यासाठी ४ ते ५ मिनिटांचा कालावधी लागतो. यामुळे बरेचशे विद्यार्थी त्रासून हजेरीच लावत नाही. त्याचबरोबर काही विद्यार्थी तर जाणूनबूजूनच हजेरी लावत नाही. ५०० विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवणे मुख्याध्यापकालाही शक्य होत नाही. बायोमेट्रिक मशीनबरोबरच या विद्यार्थ्यांची साधी हजेरीही घेतली जाते. त्यामुळे या दोन हजेऱ्यांमध्ये फरक पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अनुदानित आश्रमशाळांना प्रती विद्यार्थी मासिक ९३० रूपये एवढे अनुदान दिले जाते. अनुदान मिळण्यासाठी विद्यार्थी महिन्यातून किमान २० दिवस हजर असणे आवश्यक आहे. अन्यथा सदर विद्यार्थ्याचे अनुदानच प्राप्त होत नाही. असे झाल्यास अनुदानित आश्रमशाळांना मिळणाऱ्या अनुदानात कमालीची घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी बायोमेट्रिक मशीनवर हजेरी लावेल याकडे प्रत्येक कर्मचाऱ्याने लक्ष घालावे, असे आदेश दिले आहेत. संस्थाप्रमुखांचा आदेश मानत कर्मचारीही हजेरीकडे जातीने लक्ष घालीत आहेत. बायोमेट्रिक मशीनला साधी हजेरी हा पर्याय ठेवण्यात आला आहे. मात्र एखाद्या अधिकाऱ्याने साधी हजेरी मान्य न करता बायोमेट्रीक मशीनच्या आधारे अनुदान काढण्याचे धोरण अवलंबिल्यास अनुदानित आश्रमशाळा प्रशासनाची गोची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बायोमेट्रिकचे काही तोटे जरूर असले तरी आश्रमशाळांमध्ये आजपर्यंत सुरू असलेल्या बेलगाम कारभारावर आळा घालण्यास फार मोठी मदत होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या पद्धतीचे समर्थन केले आहे. (नगर प्रतिनिधी)