व्यापाऱ्यांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 05:00 AM2021-09-03T05:00:00+5:302021-09-03T05:00:44+5:30

कुरखेडा  शहरात एकूण सात कृषी केंद्र चालकांकडून खत विक्री केली जाते. त्या कृषी केंद्रात युरिया खत  नसल्याने शेतकरी बांधव निराश होऊन रिकाम्या हाताने आपल्या गावी जात आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांना एका कृषी केंद्र चालकाकडे युरिया खत असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी त्या दुकानदाराकडे धाव घेतली; पण त्या ठिकाणी युरिया खताची चढ्या दराने विक्री होत असल्याचे प्रकरण दिसून आले.

Attempts by traders to create an artificial shortage of urea | व्यापाऱ्यांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न

व्यापाऱ्यांकडून युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करण्याचा प्रयत्न

googlenewsNext

सिराज पठाण
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : धान पिकाच्या वाढीसाठी आता शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांची मागणी वाढत आहे. याचा फायदा घेत काही व्यापारी युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करून चढ्या दराने युरियाची विक्री करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे कृषी विभागाने कृषी दुकानदारांच्या स्टॉक आणि विक्रीची नियमित तपासणी करून गडबड करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  
येथील एका  कृषी केंद्रात युरिया खत उपलब्ध असूनही   शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी त्या कृषी केंद्र चालकावर कारवाई करण्याची मागणी  तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे केली आहे. कुरखेडा  शहरात एकूण सात कृषी केंद्र चालकांकडून खत विक्री केली जाते. त्या कृषी केंद्रात युरिया खत  नसल्याने शेतकरी बांधव निराश होऊन रिकाम्या हाताने आपल्या गावी जात आहेत. दरम्यान, काही शेतकऱ्यांना एका कृषी केंद्र चालकाकडे युरिया खत असल्याची माहिती मिळाली. शेतकऱ्यांनी त्या दुकानदाराकडे धाव घेतली; पण त्या ठिकाणी युरिया खताची चढ्या दराने विक्री होत असल्याचे प्रकरण दिसून आले.
शेतकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष जवाहर सोनकुसरे यांच्या नेतृत्वात निवेदन देऊन योग्य ती चौकशी करावी आणि कृषी केंद्र चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शेतकरी देवानंद लोंहबरे, ईमरान कुरेशी, अंकुश कोकोडे, कमलेश दुर्वे, दुर्योधन साहरे, मोरेश्वर तुलावी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.

युरिया संपल्याचे सांगत शेतकऱ्यांची बोळवण 
युरियाची चढ्या दराने विक्री सुरू असताना काही शेतकऱ्यांनी आम्हालाही युरिया पाहिजे, असे म्हटले. त्यावर आमच्याकडे आता फक्त ११ युरिया बॅग उपलब्ध आहेत व अगोदर आलेल्या ग्राहकांना मिळणार आहेत, असे उत्तर त्यांना मिळाले. त्यामुळे तालुक्यातील काही युवा शेतकऱ्यांनी या संदर्भातील तक्रार कृषी अधिकारी गेडाम यांना देऊन घटनास्थळी नेले. तिथे जवळपास १०० युरियाच्या बॅग उपलब्ध असल्याचे दिसून आले. 
युरिया खत घेण्याकरिता गर्दी जमल्याने दुकानदार कृषी केंद्र बंद करून निघून गेला. दुकानदार शेतकऱ्यांशी खोटे बोलून प्रतिबॅग ३५० रुपये दराने विकत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याप्रकरणी शेतकरी तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर यांच्याकडे तक्रार देण्यासाठी गेले; पण त्या हजर नसल्याने त्यांनी भ्रमणध्वनीवरून शेतकऱ्यांशी बोलून पंचायत समितीचे कृषी अधिकारी गेडाम यांच्याकडे तक्रार देण्यास सांगितले.

 

Web Title: Attempts by traders to create an artificial shortage of urea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.