आश्रमशाळांचा अभ्यासक्रम माघारणार
By Admin | Updated: August 23, 2014 23:59 IST2014-08-23T23:59:08+5:302014-08-23T23:59:08+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत एकूण २५ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक

आश्रमशाळांचा अभ्यासक्रम माघारणार
गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत एकूण २५ शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा आहेत. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. मात्र गडचिरोली आश्रमशाळांमधील विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचे एकूण ५२ पदे रिक्त आहेत. या रिक्तपदांवर अद्यापही तासिका मानधन तत्वावरील शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे यंदा शासकीय आश्रमशाळांचा अभ्यासक्रम माघारणार, अशी शक्यता निर्माण झाली आहे.
गडचिरोली प्रकल्पांतर्गत अनेक शासकीय आश्रमशाळांमध्ये विविध संवर्गाची एकूण १२३ पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमध्ये उच्च माध्यमिक शिक्षक १४, माध्यमिक शिक्षक १८, पदवीधर प्राथमिक शिक्षक ७ आणि प्राथमिक शिक्षकांचे सर्वाधिक २३ पदे रिक्त आहेत. आदिवासी विभागांतर्गत शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची रिक्तपदे भरण्याची कारवाई अप्पर आयुक्त कार्यालयाच्यास्तरावरून केल्या जाते. यापूर्वी या कार्यालयाच्यावतीने रिक्तपदे भरण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्यात आली. मात्र या परीक्षेचा निकाल अद्यापही लागला नाही. त्यामुळे सदर पदे रिक्तच आहेत. या रिक्तपदांवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी तात्पुरत्या स्वरूपात तासिका मानधन तत्वावरील शिक्षकांची दरवर्षी जुलै महिन्यात नियुक्ती करण्यात येते. अनेक उमेदवारांनी मानधन शिक्षकांसाठी प्रकल्प कार्यालयात अर्ज सादर केले आहे. मात्र प्रकल्प कार्यालयाकडून मानधन शिक्षकांच्या नियुक्तीसाठी विलंब होत आहे. यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. अनेक शासकीय आश्रमशाळांमध्ये रिक्तपदांमुळे अनेक विषयांचे तास होत नसल्याचे दिसून येत आहे. काही आश्रमशाळांच्या मुख्याध्यापकांनी कार्यरत शिक्षकांवर रिक्तपद असलेल्या शिक्षकांचा अतिरिक्त कार्यभार सोपविला आहे. सदर शिक्षक आपले नियमित वर्ग सांभाळून मुख्याध्यापकांच्या सुचनेचे पालन करून इतर वर्गाचे तास घेत असल्याचे दिसून येते. (स्थानिक प्रतिनिधी)