The ashram school is immediately empty | आश्रमशाळा तूर्त रिकाम्याच

आश्रमशाळा तूर्त रिकाम्याच

ठळक मुद्देविद्यार्थ्यांना घरूनच करावा लागणार अभ्यास । क्लस्टर पद्धतीची शिक्षण प्रक्रिया लांबणीवर

दिलीप दहेलकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊनच्या काळातही आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावांमध्ये जाऊन गटागटाने (क्लस्टर पद्धतीने) शिकवण्याचा निर्णय राज्याच्या आदिवासी विकास विभागाने घेतला होता. त्याची तयारी म्हणून विद्यार्थ्यांना पुस्तक वाटपाचे कामही सुरू आहे. पण १९ जून २०२० च्या त्या शासन निर्णयास आदिवासी विकास विभागाने आता स्थगिती दिली. त्यामुळे आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांना आता आपापल्या घरातच अभ्यास करावा लागणार आहे.
१९ जून २०२० च्या परिपत्रकानुसार आश्रमशाळा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २६ जूनपासून आश्रमशाळेत उपस्थित राहून शैक्षणिक नियोजन, आरोग्यविषयक, मूलभूत सुविधा व इतर बाबींसंदर्भात कामे करण्याबाबत मार्गदर्शन सूचना करण्यात आल्या होत्या. या शासन निर्णयाची अंमलबजावणी गडचिरोली, अहेरी व भामरागड प्रकल्पात सुरू करण्यात आली होती. मात्र २९ जून २०२० रोजी नव्या परिपत्रकाने १९ जूनच्या परिपत्रकास स्थगिती दिल्याने क्लस्टर पद्धतीच्या माध्यमातून होणारी शिक्षण प्रक्रिया सध्यातरी लांबणीवर पडली आहे.
अहेरी, भामरागड, गडचिरोली मिळून जिल्ह्यात ४५ शासकीय आश्रमशाळा आणि तेवढ्याच खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित आश्रमशाळा आहेत. कोरोना लॉकडाऊनच्या स्थितीत आश्रमशाळेतील वर्ग प्रत्यक्ष भरविणे आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य नाही. आश्रमशाळा व वसतिगृहाच्या बºयाच इमारती संस्थात्मक विलगीकरणासाठी वापरण्यात आल्या. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती बिकट होत असल्याने आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना बोलाविणे अशक्य आहे. आश्रमशाळा व वसतिगृह हे निवासी असल्याने संचारबंदीच्या नियमांचे पालन करणे शक्य होत नाही. त्यामुळे आॅनलाईन पद्धतीने शिक्षण देण्याबाबत आदिवासी विकास विभागात वरिष्ठ पातळीवर विचारविनिमय करण्यात आला. आश्रमशाळांचे विद्यार्थी दुर्गम व अतिदुर्गम भागातील रहिवासी आहेत. परिणामी तेथे इंटरनेट कनेक्टिव्हीटी नाही. तसेच आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन नाही. त्यामुळे आॅनलाईन शिक्षण प्रक्रिया राबविणे शक्य झाले नाही असे मुद्दे विचारात घेऊन गावांमध्ये जाऊन क्लस्टर पद्धतीने शिक्षण देण्याचा विचार करण्यात आला होता. तसे प्रकल्प कार्यालयाच्या आदेशानुसार आश्रमशाळा स्तरावर नियोजन करण्यात आले. मात्र २९ जूनच्या जीआरने स्थगिती आणली.

माहिती अद्यावत करण्याच्या कामात शिक्षक व्यस्त
कोरोना संचारबंदीच्या काळात आश्रमशाळा व वसतिगृहातील विद्यार्थी अजुनही शाळेत व वसतिगृहात पोहोचले नाही. मात्र शिक्षक व कर्मचारी २६ जूनपासून कर्तव्यावर रूजू झाले आहेत. अध्ययन, अध्यापनाची प्रक्रिया बंद असली तरी शिक्षक व कर्मचारी विद्यार्थ्यांची माहिती अद्यावत करण्याच्या कामात व्यस्त आहेत. डीबीटी प्रणालीची माहिती अद्यावत करणे, सरल यूडायस प्रणालीवर माहिती भरून विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक अद्यावत करणे, डीबीटीसाठी विद्यार्थ्यांचे बँक खाते उघडण्यासाठी सहकार्य करणे, विद्यार्थी प्रवेशाबाबतची कार्यवाही, शाळा परिसर स्वच्छ करणे आदी कामे सुरू आहेत.

बाहेरगावातील कामांची सक्ती नाही
आश्रमशाळा व वसतिगृहाच्या ठिकाणी असलेली कामे शिक्षक व कर्मचाऱ्यांना करावी लागत आहेत. मात्र विद्यार्थी रहिवासी असलेल्या गावी जाऊन क्षेत्रकार्य करण्याची शिक्षक व कर्मचाºयांवर सक्ती नाही. आता शिक्षक व कर्मचारी शाळा व वसतिगृहात राहून शक्य ती कामे करीत आहेत.

Web Title: The ashram school is immediately empty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.