स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उतरली धानाच्या बांधित; सुदैवाने अनर्थ टळला
By दिगांबर जवादे | Updated: July 14, 2023 18:06 IST2023-07-14T18:05:41+5:302023-07-14T18:06:25+5:30
अहेरी-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो.

स्टेअरिंग लॉक झाल्याने बस उतरली धानाच्या बांधित; सुदैवाने अनर्थ टळला
गडचिरोली : मानव विकास मिशनच्या बसचे स्टेअरिंग एकाकी लॉक झाल्याने बस रस्ता ओलांडून शेतात शिरली. ही घटना सिरोंचापासून २५ किमी अंतरावर असलेल्या जाफराबाद गावाजवळ शुक्रवारी घडली. यावेळी बसमध्ये विद्यार्थिनी व इतर असे जवळपास २५ प्रवासी बसले होते. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. काही विद्यार्थिनींना मात्र किरकोळ मार लागला आहे.
सिरोंचा तालुक्यातील विद्यार्थिनींच्या प्रवासासाठी अहेरी आगाराला मानव विकास मिशनच्या बसेस उपलब्ध करून दिल्या आहेत. सिरोंचा तालुक्यातील विद्यार्थिनी घेऊन बस सिरोंचाच्या दिशेने निघाली होती. बस वेगात असताना अचानक स्टेअरिंगमध्ये बिघाड निर्माण होऊन बसचे स्टेअरिंग लॉक झाले. त्यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. बस थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या धानाच्या बांध्यांमध्ये शिरली. मात्र, सुदैवाने धानाच्या बांध्यांमध्ये पाणी नसल्याने बस फसली नाही तसेच चालकाने आपले कौशल्य वापरल्याने बस उलटली नाही. विशेष म्हणजे अहेरी-सिरोंचा हा राष्ट्रीय महामार्ग आहे. मात्र, या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून जीव धोक्यात घालूनच प्रवास करावा लागतो.