मृतदेह स्मशानभूमीत आणताच दोन गट भिडले, काठ्यांनी मारहाण; पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार, विदर्भातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 13:29 IST2025-09-16T13:27:29+5:302025-09-16T13:29:17+5:30
Gadchiroli : मृतदेह बाजूला ठेवून स्मशानभूमीतच दोन गटांत झाली तुंबळ हाणामारी; पोलिसांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार

As soon as the body was brought to the crematorium, two groups clashed, beaten with sticks; Funeral in the presence of police, incidents in Vidarbha
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली): तालुक्यातील नागेपल्ली येथे रविवारी १४ सप्टेंबरला स्मशानभूमीच्या जागेवरून मोठा वाद उफाळून आला. अंत्यसंस्कारासाठी आणलेला मृतदेह बाजूला ठेवून दोन गट लाठ्याकाठ्यांसह आपापसांत भिडले. या हाणामारीत काही जण जखमी झाले असून पोलिसांनी ११ जणांवर गुन्हा नोंदवून चौघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, अनेक वर्षापासून ग्रामस्थ या स्मशानभूमीचा वापर अंत्यसंस्कारासाठी करीत आहेत. मात्र अलीकडेच बाहेरगावाहून आलेल्या काही व्यक्तींनी या जागेवर अतिक्रमण करून स्वतःचा दावा केला आहे. त्यामुळे ग्रामस्थ आणि अतिक्रमण करणारा गट यांच्यात सतत वाद सुरू होता. १४ सप्टेंबरला एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी ग्रामस्थ मृतदेह घेऊन स्मशानभूमीत पोहोचले. त्यावेळी अतिक्रमण करणाऱ्या गटाने त्यांना तिथे अंत्यसंस्कार करू देण्यास आक्षेप घेतला. यावरून तणाव वाढला आणि पाहता पाहता दोन्ही गट आमने-सामने आले. मृतदेह शेजारी ठेवूनच वाद पेटला आणि दोन्ही गट एकमेकांवर तुटून पडले.
घटनेची माहिती मिळताच अहेरी ठाण्याचे पो.नि. हर्षल एकरे हे फौजफाट्यासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवून परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार उरकण्यात आले. ११ जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून चौघांना अटक केली आहे. अधिक तपास सुरू असल्याचे पो.नि. हर्षल एकरे यांनी सांगितले.
दोनवेळा अतिक्रमण हटाव मोहीम, पण....
प्रशासनाकडे ग्रामस्थांनी या अतिक्रमणाबाबत यापूर्वीही अनेकदा तक्रारी करण्यात आल्या होत्या. दोनवेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबविली. मात्र, अतिक्रमणधारकांची मुजोरी कायम आहे, त्यावर स्थानिक प्रशासन ठोस पावले उचलत नाही, परिणामी अतिक्रमण कायम राहिले आणि अखेर स्मशानभूमीचा आखाडा झाला. अंत्यविधी खोळंबल्याने मृत व्यक्तीची अंतिम प्रवासात परवड झाली. या घटनेने स्थानिकांत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.