कला शाखेला विद्यार्थी मिळेना
By Admin | Updated: July 12, 2014 23:39 IST2014-07-12T23:39:09+5:302014-07-12T23:39:09+5:30
विज्ञान शाखेचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालल्याने या शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी कला शाखेला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कला शाखेच्या काही तुकड्या

कला शाखेला विद्यार्थी मिळेना
विद्यार्थ्यांची शोधाशोध : विज्ञान शाखा हाऊसफूल
महेंद्र चचाणे - देसाईगंज
विज्ञान शाखेचे महत्व दिवसेंदिवस वाढत चालल्याने या शाखेकडे जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. परिणामी कला शाखेला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे कला शाखेच्या काही तुकड्या बंद पडण्याची भीती निर्माण झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ७४.९८ टक्के लागला आहे. सुमारे १२ हजार १४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्हाभरात १६३ कनिष्ठ महाविद्यालये असून त्यामध्ये २३३ तुकड्या आहेत. या संपूर्ण महाविद्यालयांची प्रवेश क्षमता १६ हजार एवढी आहे. याचबरोबर काही विद्यार्थी दहावी पास झाल्यानंतर आयटीआय, पॉलीटेक्निक व इतर अभ्यासक्रमांकडे वळतात. पॉलीटेक्निकची जिल्हास्तरावर एकच शाखा असली तरी आयटीआय मात्र प्रत्येक तालुकास्तरावर असून त्यामध्ये अनेक ट्रेड आहेत. अलिकडेच आयटीआय करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे हजारो विद्यार्थी आयटीआय करतात. या सर्व शाखांना विद्यार्थी जाता ११ वीच्या तुकड्यांसाठी जवळपास ५ हजार विद्यार्थ्यांची तूट जाणवेल, असा अंदाज अगदी सुरूवातीला शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात होता. याची प्रचिती आता येऊ लागली आहे.
कला शाखेच्या जिल्ह्यात शेकडो तुकड्या आहेत. यापूर्वी ग्रामीण भागातील विद्यार्थी कला शाखेलाच प्रवेश घेत होता. मात्र अलिकडेच प्रत्येक विद्यार्थ्याचा ओढा विज्ञान शाखेकडे असल्याचे दिसून येत आहे. विज्ञान शाखेच्या तुकड्या निकालानंतर अगदी काही दिवसातच हाऊसफूल झाल्या. मात्र कला शाखेला विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. ४० टक्के गुण मिळालेला विद्यार्थीही विज्ञान शाखेला प्रवेश मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. विद्यार्थ्यांचे पालकही पाल्याची बौद्धीक कुवत लक्षात न घेता त्याला विज्ञान शाखेला प्रवेश घेण्यासाठी जबरदस्ती करीत असल्याचे दिसून येत आहे.
दहावीच्या परीक्षेत २० टक्के गुण देण्याचे अधिकार शाळा प्रशासनाला होते. त्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांच्या गुणांची टक्केवारी वाढली असल्याचे दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक विद्यार्थ्याला विज्ञान शाखेचाच तगादा लावीत आहेत. पूर्वी विज्ञान शाखेच्या प्रवेशासाठी गणित व विज्ञान विषयात ४० टक्के गुणांची अट लावण्यात आली होती. मात्र अलिकडेच ही अट काढून टाकण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थी विज्ञान शाखेला प्रवेश घेऊ शकतो.
पूर्वी विज्ञान महाविद्यालयांची संख्या कमी होती. मात्र विनाअनुदानित प्रकारामुळे विज्ञान महाविद्यालयेसुद्धा गल्लीबोळात निर्माण झाली आहेत. यावर्षी निकाल लागून २० दिवसाचा कालावधी लोटूनही कला शाखेत प्रवेश पूर्ण झाले नाहीत. त्यामुळे प्राध्यापकांना विद्यार्थ्यांसाठी शोधाशोध करावी लागत आहे. भविष्यात ही परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षण विभागाने सर्व महाविद्यालयांना विद्यार्थी मिळतील यासाठी केंद्रीय पद्धत राबवावी, अशीही मागणी महाविद्यालय प्रशासनाकडून केली जात आहे.