गणराजाच्या आगमनाने वरूण राजाही बरसला
By Admin | Updated: August 30, 2014 23:43 IST2014-08-30T23:43:53+5:302014-08-30T23:43:53+5:30
गेल्या एक ते दीड महिन्यांपासून रजेवर गेलेला वरूण राजा गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात पुन्हा रूजू झाला आहे. शुक्रवार व शनिवारी जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचे आगमन झालेत. त्यामुळे बळीराजाही सुखावला आहे.

गणराजाच्या आगमनाने वरूण राजाही बरसला
गडचिरोली : गेल्या एक ते दीड महिन्यांपासून रजेवर गेलेला वरूण राजा गणेश चतुर्थीपासून जिल्ह्यात पुन्हा रूजू झाला आहे. शुक्रवार व शनिवारी जिल्ह्याच्या विविध भागात पावसाचे आगमन झालेत. त्यामुळे बळीराजाही सुखावला आहे. आतापर्यंत चिंतीत असलेल्या बळीराजाला विघ्नहर्त्याने तारण्यासाठी पाऊस दाखल झाला, अशी प्रतिक्रिया ग्रामीण भागात उमटली आहे. मात्र सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाची वरूण राजाच्या आगमनाने तारांबळ उडाली असून काही गणेश मंडळांनी दरवर्षी पाऊस येतोच हे लक्षात घेऊन वॉटरफ्रूफ शामीयानाची व्यवस्था केली आहे. वरूणराजाच्या आगमनाने यंदा गौरी, गणपती उत्साहात साजरे होतील. गडचिरोली जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक आहे. रोवणी झाल्यानंतर ग्रामीण भागातील लोक गणरायाच्या उत्सवात सहभागी होतात. अनेक गावातून झांझ व पखवाज वाजविणारे लोकही १० दिवस या उत्सवात विरंगुळा म्हणून सहभागी होतात. अनेक सार्वजनिक गणेश मंडळ सामाजिक उपक्रमही ग्रामीण व शहरी भागात राबवित असतात. दुष्काळाचे सावट असल्यामुळे गणेश उत्सवावरही याची छाया होती. मात्र गणपतीच्या आगमनाबरोबरच वरूणराजाचे आगमन झाल्याने उत्साह दुणावला.