पाेलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला आराेपी पुन्हा अटकेत

By दिगांबर जवादे | Updated: December 19, 2023 16:07 IST2023-12-19T16:07:07+5:302023-12-19T16:07:49+5:30

कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता नेण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना चकमा देत साेमवारी पळून गेला होता.

Arrested again after giving a hint to the police in gadchiroli | पाेलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला आराेपी पुन्हा अटकेत

पाेलिसांना गुंगारा देऊन पसार झालेला आराेपी पुन्हा अटकेत

दिगांबर जवादे,गडचिराेली : कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय तपासणीकरिता नेण्यात आलेल्या आरोपीने पोलिसांना चकमा देत साेमवारी पळून गेला होता. पोलिसांनी युद्ध स्तरावर शोध मोहीम राबवत अवघ्या काही तासांतच सोमवारी रात्री त्याला पुन्हा अटक केली.

प्रेमल खेमचंद कराडे (२२, रा. चन्ना भाकती, ता. अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) असे आराेपीचे नाव आहे. प्रेमल याने कुरखेडा तालुक्यातील एका मुलीचे लैंगिक शाेषण केल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी कुरखेडा पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली हाेती. त्यानुसार कुरखेडा पाेलिसांनी त्याच्याविराेधात गुन्हा दाखल करून सोमवारी अटक केली. वैद्यकीय तपासणीकरिता दुपारी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते. 

तपासणीदरम्यान पोटात मळमळ वाटते असे सांगत उलटी करण्याच्या बहाण्याने ताे खिडकीजवळ गेला. संधी साधत खिडकीतून उडी घेत ताे पळून गेला. आराेपी पळून गेल्याने पाेलिसांची तारंबळ उडाली. त्याचा शाेध सुरू केला. ताे एका नातेवाईकाकडे थांबला असल्याची गाेपनीय माहिती पाेलिसांना मिळाली. नातेवाईकांचे घर गाठून त्याला पुन्हा अटक केली. त्यानंतर पाेलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Web Title: Arrested again after giving a hint to the police in gadchiroli