पट्टेदार वाघाच्या दहशतीने पुन्हा हादरला आरमोरी तालुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 00:41 IST2018-11-29T00:41:08+5:302018-11-29T00:41:31+5:30
तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक जवळील जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातानाचे क्षण वनविभागाने लावलेल्या कॅमेरात ट्रॅप झाले आहेत.

पट्टेदार वाघाच्या दहशतीने पुन्हा हादरला आरमोरी तालुका
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : तालुक्यात यावर्षी पुन्हा पट्टेदार वाघाने आपले अस्तित्व दाखवत दहशत निर्माण केली आहे. मंगळवारी आरमोरीजवळील रामपूर चक जवळील जंगलात पट्टेदार वाघाने गायीच्या कळपावर हल्ला करून एका गायीला ठार केले. शिकारीनंतर गायीवर ताव मारण्यासाठी दुसरीकडे घेऊन जातानाचे क्षण वनविभागाने लावलेल्या कॅमेरात ट्रॅप झाले आहेत. सदर छायाचित्र बघून वाघाच्या दहशतीचा अंदाज येतो.
दीड वर्षांपूर्वी आरमोरीपासून जवळच असलेल्या रवी व कोंढाळा या दोन गावातील प्रत्येकी एका व्यक्तीला ठार केले होते. त्यानंतर वाघाच्या जोडीने उन्हाळ्यात याच ठिकाणी जवळपास महिनाभर बस्तान मांडून जवळपासच्या प्राण्यांवर हल्ला केला होता. पावसाळ्यात या परिसरातून वाघ निघून गेल्याने दहशत कमी झाली होती. त्यानंतर पुन्हा आता मागील चार महिन्यांपासून वाघाने दहशत निर्माण केली आहे. १५ दिवसांपूर्वी चुरमुरा येथील एका शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला जखमी केले होते. तसेच वडधा, देलोडा परिसरातही वाघाने जनावरांना ठार केले आहे. त्यामुळे नागरिक कमालीचे दहशतीत आहेत.
मंगळवारी २७ नोव्हेंबर रोजी रामपूर चक येथील जनावरांचा कळप जंगलात चरण्यासाठी गेला असता, वाघाने दुपारी १२ वाजताच्या सुमारास कळपावर हल्ला केला. यात एक गाय ठार झाली. सदर गाय धनराज ठाकरे यांच्या मालकीची होती. गुराख्याने आरडाओरड केल्यानंतर गायीला ठार करून वाघ पळून गेला. याबाबतची माहिती लगेच वन विभागाला देण्यात आली. आरमोरीचे वन परिक्षेत्राधिकारी सुनील सोनटक्के यांच्या मार्गदशनात क्षेत्र सहायक रमेश गोटेफोडे, वनरक्षक सुखदेव दोनाडकर यांनी घटनास्थळी जाऊन तत्काळ जाऊन पंचनामा केला.
दरम्यान गायीला ज्या ठिकाणी वाघाने मारले होते त्या ठिकाणी पुन्हा वाघ येईल म्हणून वन विभागाने घटनास्थळी ट्रॅपिंग कॅमेरा लावला. सायंकाळी ५ वाजता सदर वाघ पुन्हा गायीला खाण्यासाठी शिकारीच्या ठिकाणी आल्यामुळे तो कॅमेरात ट्रॅप झाला आहे. या वाघाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी, गुराख्यांनी वनविभागाकडे केली आहे.