नियमात शिथिलता देऊन योजना राबवा
By Admin | Updated: January 29, 2015 23:06 IST2015-01-29T23:06:02+5:302015-01-29T23:06:02+5:30
जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून नियम व निकषात शिथिलता आणून योजनांची अंमलबजावणी करा, लहानसहान कामासाठी नागरिकांना वेळोवेळी कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची पाळी आणू नका,

नियमात शिथिलता देऊन योजना राबवा
आढावा बैठक : सहकार राज्यमंत्र्यांची अधिकाऱ्यांना सूचना
गडचिरोली : जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून नियम व निकषात शिथिलता आणून योजनांची अंमलबजावणी करा, लहानसहान कामासाठी नागरिकांना वेळोवेळी कार्यालयाचे उंबरठे झिजविण्याची पाळी आणू नका, अशा स्पष्ट सूचना राज्याचे सहकार राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात गुरूवारी विकास आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. बैठकीला खा. राहुल शेवाडे, जिल्हाधिकारी रणजितकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, उपविभागीय अधिकारी पी. शिवशंकर, तहसीलदार जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, जिल्हा उपनिबंधक जयेश अहेर, निवासी उपजिल्हाधिकारी राम जोशी, तहसीलदार भंडारी यांच्यासह विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.
आढावा बैठकीदरम्यान ना. भुसे यांनी रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदांची माहिती जाणून घेतली. कृषी, सिंचन, रस्ता बांधकाम, नगर पालिका क्षेत्रातील घरकूल, संजय गांधी निराधार योजना, वन विभागाचे तलाव, मामा तलाव, जलयुक्त शिवार योजना आदींचा आढावा घेतला. वडसा-गडचिरोली रेल्वेचा प्रश्न केंद्र शासनाकडे पाठपुरावा करून सोडविण्यात येईल, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना देण्यात येणारे मानधन वाढविण्याकरिता शासनस्तरावर प्रयत्न केले जातील, असे आश्वासन ना. दादाजी भुसे यांनी दिले.
(नगर प्रतिनिधी)