संतप्त भूमिहीनांची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 00:44 IST2018-12-06T00:43:31+5:302018-12-06T00:44:30+5:30
तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायत अंतर्गत साजा क्रमांक १४ मधील वनजमीन, सरकारी आबादी व मिन्हाई गोचर या जमिनीवर जंगल असताना येथे चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमणाची नोंद करून घेतली.

संतप्त भूमिहीनांची तहसीलवर धडक
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील पेंटींपाका ग्राम पंचायत अंतर्गत साजा क्रमांक १४ मधील वनजमीन, सरकारी आबादी व मिन्हाई गोचर या जमिनीवर जंगल असताना येथे चुकीच्या पद्धतीने काही लोकांनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून अतिक्रमणाची नोंद करून घेतली. ही संपूर्ण प्रक्रिया बोगस असून अतिक्रमण नोंदी रद्द करून गरीब व गरजूंना जमीन वाटप करावी, या मागणीसाठी तीन गावातील नागरिकांनी जि. प. च्या महिला व बाल कल्याण समिती सभापती जयसुधा जनगाम यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर बुधवारी धडक दिली.
साजा क्रमांक १४ मध्ये अतिक्रमित जमिनीवरील बोगस नोंदीची योग्य चौकशी करून चौकशीअंती सर्व जमीन सरकार जमा करून सदर जमीन लंबडपल्ली, मुगापूर व मृदूकृष्णापूर या तीन गावातील गरीब व गरजूंना वाटप करावी या मागणीसाठी तिन्ही गावातील नागरिक एकवटले होते. तहसीलदारांमार्फत नागपूर विभागीय आयुक्तांना निवेदन पाठविण्यात आले.
पेंटींपाका येथील साजा क्रमांक १४ मध्ये घनदाट जंगल आहे. यात सरकारी आबादी, मिन्हाई गोचर व वनजमीन असून उभ्या जंगलावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण नसताना व कोणीही आजपर्यंत जमिनीवर अतिक्रमण केले नसताना अनेकांच्या नावाने अतिक्रमण पंजीत, गाव नकाशा व सातबाºयावर बोगस पद्धतीने अतिक्रमण नोंद केल्याने या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली.
पोचमपल्ली गावा जवळील गोदावरी नदीवर बांधण्यात येत असलेल्या मेडिगड्डा सिंचन प्रकल्पामुळे तिन्ही गावे प्रभावित होणार असल्याने भविष्यात या गावांची पुनर्वसनाची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
निवेदन नायब तहसीलदार गोवर्धन गागापूरपुवार यांनी स्वीकारले. निवेदन देताना जि. प. सभापती जयसुधा जनगाम, आविसं तालुकाध्यक्ष बानय्या जनगाम, सल्लागार रवी सल्लमवार, ग्रा. पं. सदस्य सोमय्या गादे, सडवली जनगाम व लंबडपल्ली, मुगापूर, मृदूकृष्णापूर येथील नागरिक हजर होते.