चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 00:10 IST2018-05-09T00:10:09+5:302018-05-09T00:10:09+5:30
२२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता.

चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : २२ एप्रिल रोजी भामरागड तालुक्याच्या कसनासूर जंगलात झालेल्या पोलीस नक्षल चकमकीत ३४ नक्षलवादी ठार झाले. सदर घटनेबाबत सत्यशोधन समितीच्या सदस्यांनी सोमवारी पत्र परिषद घेऊन ही चकमक बनावट असल्याचा आरोप केला होता. त्या पार्श्वभूमीवर मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी पत्र परिषद घेऊन सत्यशोधन समितीचे सर्व आरोप फेटाळले. तसेच कसनासूर चकमकीत ठार झालेले सर्व इसम नक्षलवादी आहेत. झालेली ही चकमक १०० टक्के खरी असून या चकमकीत निरपराध लोकांचा बळी गेला नाही, असा दावा भारतीय मानवाधिकार परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी गडचिरोली येथे पत्र परिषद घेऊन केला.
पत्र परिषदेला मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे, प्रदेश निरिक्षक पुरूषोत्तम ठाकरे, विभागीय अध्यक्ष शशिकांत मोकासे, विलास झोडगे, मंगेश कामडी, निखील सुंदरकर, रेवती रेभनकर, दिनेश चुधरी, माधवी कुळमेथे, संजय रामटेके आदी उपस्थित होते.
यावेळी पुरूषोत्तम ठाकरे व गजेंद्र डोमळे यांनी सांगितले की, मानवाधिकार परिषदेचे संस्थापक अध्यक्ष अविनाश मोकाशी यांनी कसनासूर जंगलात झालेल्या नक्षल चकमकीची दखल घेऊन चौकशी समिती तयार केली. या समितीतील सहा पदाधिकाºयांनी ६ मे रोजी कसनासूर व बोरीया गावाला प्रत्यक्ष भेट देऊन या घटनेची सत्यता स्थानिकांकडून जाणून घेतली. सदर चकमक खोटी नसून सत्य आहे, असे चौकशीअंती कळले, असे डोमळे व ठाकरे यावेळी म्हणाले. भारतीय मानवाधिकार परिषद ही नक्षल समर्थक अथवा नक्षलविरोधी नाही. तसेच पोलीस समर्थक अथवा पोलीस विरोधीही नाही, असे स्पष्ट करीत कसनासूर चकमकीबाबत ज्या संस्था व व्यक्तींनी नक्षल समर्थनाची भूमिका घेतली आहे, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच केंद्रीय व राज्य मानवाधिकार आयोगाकडून सदर नक्षल चकमकीची नि:पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.