निधी खर्च करण्यात सारेच आमदार ‘शेर’
By Admin | Updated: July 23, 2014 23:37 IST2014-07-23T23:37:08+5:302014-07-23T23:37:08+5:30
गडचिरोली या राज्यातील मागास व अतिदुर्गम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ६० टक्क्यापेक्षा अधिक निधी खर्च केला आहे.

निधी खर्च करण्यात सारेच आमदार ‘शेर’
गडचिरोली : गडचिरोली या राज्यातील मागास व अतिदुर्गम जिल्ह्यात तीन विधानसभा मतदार संघ आहेत. या मतदार संघातील लोकप्रतिनिधींनी आपल्या स्थानिक विकास निधीतून ६० टक्क्यापेक्षा अधिक निधी खर्च केला आहे. या निधीतून अनेक गावांमध्ये विकासकामे करण्यात आली आहे.
अहेरी या दुर्गम व अतिमागास विधानसभा मतदार संघात मागीलच पाच वर्षाच्या निधीतून ५७७ कामे करण्यात आले आहे. २००९-१० मध्ये ३२ लाख ३ हजार ११६ रूपयाचा निधी खर्च करण्यात आला. २०१०-११ मध्ये २ कोटी १५ लाख ६८०, २०११-१२ मध्ये १ कोटी ९४ लाख ८ हजार ४२८, २०१२-१३ मध्ये १ कोटी २५ लाख ६८ हजार, २०१३-१४ या वर्षात १ कोटी ८७ लाख ८ हजार ९० रूपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. २००९-१० या वर्षांमध्ये आमदारांना १ कोटी ५० लाखाचा स्थानिक विकास निधी मंजूर करण्यात आला होता. तो २०१०-११ पासून २ कोटीचा झालेला आहे. मागील ५ वर्षाच्या कार्यकाळात अहेरी विधानसभा क्षेत्रात स्थानिक आमदारांनी ७ कोटी ५५ लाख ७९ हजार ६८ रूपयाचा निधी खर्च केलेला आहे. त्यांची निधी खर्च करण्याची कामगिरी जिल्ह्यात सर्वात सरस आहे.
आरमोरी विधानसभा क्षेत्रात वर्षाला आमदारांना मिळणारा २ कोटींचा निधी खर्च करण्यात आला आहे. हा निधी खर्च करताना दीडपट रक्कमेचे नियोजन करून काम सुचविण्यात आले. त्यामुळे गतवर्षीचे काम पुढील वर्षीही निधीतून पुर्णत्वास नेण्यात आले. त्यामुळे या मतदार संघात स्थानिक विकास निधीतून काम पूर्ण करण्यात आले. वर्ष २०१२-१३ मध्ये या मतदार संघात ६२.१० लाखातून ८ डांबरी रस्त्याचे काम, १५.० लाखातून ४ कच्च्या रस्त्याचे काम तर १ कोटी रूपयातून २४ सभामंडपाचे काम करण्यात आले. त्यावर्षी १ कोटी ७७ लाख १ हजार रूपयाच्या कामाचे नियोजन करण्यात आले होते. दरवर्षीच दीडपट नियोजनामुळे या मतदार संघात संपूर्ण निधी खर्च करण्यात आला आहे. यंदा मात्र १ कोटी ३० लाखाचाच निधी स्थानिक आमदारांच्या वाट्याला येणार आहे. त्यात ६२ लाखाच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली आहे. तर ८२ लाखाचे प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्रलंबित आहे, अशी माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे.
गडचिरोली विधानसभा मतदार संघात सन २००९-१० या वर्षात २ कोटी ९५ लाख ३० हजार रूपयातून ११ कामे करण्यात आले. २०१०-११ या वर्षात १ कोटी १५ लाख ५३ हजार रूपयाच्या निधीतून ८ कामे करण्यात आले. २०११-१२ या वर्षात २० कामे २ कोटी ८२ लाख ८७ हजाराचे काम मंजूर करण्यात आले होते. २०१२-१३ मध्ये १२ कोटी ५४ लाख ८८ हजार रूपयातून ८६ कामे मंजूर करण्यात आले आहेत. आमदारांना वार्षिक २ कोटी रूपयाचा निधी उपलब्ध होतो. मात्र दीडपट नियोजनाच्या पध्दतीनुसार या कामांचे नियोजन सर्वच लोकप्रतिनिधी करतात. त्यामुळे अनेक लोकप्रतिनिधींचा निधी पुढील वर्षी कामात खर्च होतो. गेल्या चार वर्षात गडचिरोली विधानसभा मतदार संघात १२५ कामांवर १९ कोटी ४८ लाख ५८ हजार रूपयाचा निधी खर्च करण्यात आला आहे. अनेक गावांच्या पुढाऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे निधीची मागणी केल्यानंतर त्यांना तत्काळ पत्र दिले जाते. त्यामुळे हा निधी अनेक गावांना दिला जात आहे.(लोकमत न्यूज नेटवर्क)