सारेच ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित

By Admin | Updated: December 14, 2015 01:40 IST2015-12-14T01:39:30+5:302015-12-14T01:40:15+5:30

गडचिरोली जिल्ह्याला निसर्ग संपत्तीचे भरभरून वरदान मिळाले असून प्राचीन काळी अनेक समृद्ध संस्कृती या भागात नांदल्याचे येथील पुरातन मंदिरे व गडकिल्ल्यांना बघून लक्षात येते.

All historic sites are neglected | सारेच ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित

सारेच ऐतिहासिक स्थळे दुर्लक्षित

शासन उदासीन : जिल्ह्यातील प्राचीन वारसा नष्ट होण्याच्या मार्गावर
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याला निसर्ग संपत्तीचे भरभरून वरदान मिळाले असून प्राचीन काळी अनेक समृद्ध संस्कृती या भागात नांदल्याचे येथील पुरातन मंदिरे व गडकिल्ल्यांना बघून लक्षात येते. पण, महाभारतकालीन राजा विराटपासून गोंडराजांपर्यंतच्या वैभवशाली राजवटीची साक्ष देणारी ऐतिहासिक स्थळे आता नामशेष होताना दिसत आहेत. या ऐतिहासिक स्थळांच्या जतनाकडे पुरातत्त्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असताना शासनही याबद्दल उदासीनच दिसत आहे. एरवी छोट्या-छोट्या बाबीसाठी रान उठविणारे लोकप्रतिनिधी या महत्त्वाच्या मुद्यांवर अधिवेशनात एक शब्दसुद्धा बोलताना दिसत नाहीत.
झाडीपट्टीत मोडणाऱ्या या जिल्ह्यात वैरागडचा किल्ला, भंडारेश्वर मंदिर, अरततोंडी, विदर्भाची काशी अशी ओळख असलेले मार्कंडेश्वर मंदिर, निसर्गरम्य टिपागड अशी अनेक ऐतिहासिक स्थळे आहेत. आरमोरी तालुक्यातील वैरागड येथील भंडारेश्वर मंदिर व ऐतिहासिक किल्ला शेवटच्या घटका मोजत आहे. येथील किल्ल्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. भंडारेश्वर मंदिराच्या सौंदर्यीकरणासाठी मागील वर्षभरापासून खोदकाम करून ठेवले आहे. पण, शासनाचे उदासीन धोरण व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष असल्याने सौंदर्यीकरणाचे काम रखडले आहे. वैरागड येथे हिऱ्याची खाण असल्याचा प्राचीन इतिहासात उल्लेख आहे. संशोधनाअंती येथे हिरे असल्याचेही सिद्ध झाले आहे. मात्र, या परिसराचा विकास करण्याचे कोणतेच धोरण शासनाने कधी आखले नाही. चामोर्शी तालुक्यातील वैनगंगा नदीच्या तीरावर मार्कंडेश्वर मंदिर आहे. या मंदिरातील शिल्पाकृती खजुराहो येथील शिल्पाकृतीच्या तोडीच्या आहेत. पण या शिल्पाकृतीचे व मंदिराचे जतन करण्याचे वेगवान प्रयत्न अद्यापही झाले नाही. महाशिवरात्रीला येथे भव्य यात्रा भरते. या यात्रेसाठीही जागा उपलब्ध करून देण्याकडे शासन कानाडोळा करीत आहे. विशेष म्हणजे मार्कंडेश्वर मंदिरासारखी आणखी काही मंदिरे जिल्ह्यात असण्याची शक्यता आहे.पण, येथे इतिहास संशोधकही फिरकत नाहीत. त्यांच्या संशोधनाला वाव मिळेल, त्यांना प्रोत्साहन मिळेल यासाठीही कोणतेच प्रयत्न होत नाही. इतिहास संशोधकांना येथे पाचारण करण्यात आल्यास जिल्ह्यात अनेक ठिकाणी प्राचीन इतिहासाची साक्ष देणारे अवशेष निश्चित मिळू शकतात.पण, असंख्य समस्यांच्या विळख्यातील या जिल्ह्यातील हा ऐतिहासिक वारसा समस्येने ग्रस्तच आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

विदर्भाची काशी मार्र्कं डा शासनाच्या लेखी दुर्लक्षित
उत्तर वाहिणी असलेल्या वैनगंगा नदीच्या तीरावर मार्र्कं डा येथे हेमाडंपंथीय शिव मंदिर आहे. सदर शिव मंदिर ऐतिहासिक व प्राचीन असून या मंदिराला विविध समस्यांनी घेरलेले आहे. येथील मंदिराचा मुख्य कळस ५० वर्षांहून अधिक काळापासून कोसळलेल्या स्थितीत असून तो पूर्ववत दुरूस्त करण्याकडे पुरातत्त्व विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. या मंदिर समुहातील अनेक मंदिरांची पडझळ झाली असून याची जुन्या पद्धतीने पूर्नबांधणी करण्याचे कामही प्रशासकीय स्तरावर रखडलेले आहे. या मंदिराला यात्राकाळात मोठ्या जागेची गरज राहते. परंतु ही जागाही उपलब्ध झालेली नाही. खासदार, आमदार यांच्याकडे मंदिराच्या समस्यांबाबत अनेकदा निवेदन देण्यात आले. परंतु शासनस्तरावरून कमालीची उदासीनता या संदर्भात दिसून येत आहे.

पर्यटकांची पावलेही अडखळतात
निसर्गाचा अमुल्य ठेवा व अनेक ऐतिहासिक, प्राचीन मंदिरे, शिल्पे या जिल्ह्यात असली, तरी नक्षलवादाचा शाप भोगणाऱ्या या जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची पावले वेशीवरच अडखळतात. देशाच्या अन्य भागात कमी प्रतीची जंगले व थातूरमातूर बाबी असल्या, तरी तिथे पर्यटकांची झुंबड उडते. मात्र गडचिरोली याबाबत दुर्लक्षित ठरली आहे. पर्यटक आता कुठे काही प्रमाणात हेमलकसा येथे येताना दिसून येत आहे.

Web Title: All historic sites are neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.