जि.प. अध्यक्षपदी अजय कंकडालवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 06:00 AM2020-01-04T06:00:00+5:302020-01-04T06:00:17+5:30

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसंचे वेलगूर-आलापल्ली (ता.अहेरी) क्षेत्राचे सदस्य अजय कंकडालवार यांना २९ तर भाजपचे घोट-सुभाषग्राम (ता.चामोर्शी) क्षेत्राचे सदस्य नामदेव सोनटक्के यांना २२ मते तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे येरकड-रांगी (ता.धानोरा) क्षेत्राचे सदस्य मनोहर पोरेटी यांना २९ तर भाजपचे कालीनगर-विवेकानंदपूर (ता.मुलचेरा) क्षेत्राचे सदस्य युधीष्ठिर विश्वास यांना २२ मते मिळाली.

Ajay Kankdalwar as President of ZP | जि.प. अध्यक्षपदी अजय कंकडालवार

जि.प. अध्यक्षपदी अजय कंकडालवार

Next
ठळक मुद्देउपाध्यक्षपदी काँग्रेसचे मनोहर पोरेटी : सर्वाधिक सदस्यसंख्या असलेल्या भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या अतिशय चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत नाट्यमय घडामोडी घडल्या. ५१ पैकी केवळ ७ सदस्यसंख्या असलेल्या आदिवासी विद्यार्थी संघाचे नेते आणि विद्यमान जि.प.उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांनी अखेर बाजी मारत अध्यक्षपद काबिज केले, तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे मनोहर पोरेटी विजयी झाले. सर्वाधिक २० सदस्यसंख्या असताना भाजपला आणि ५ सदस्यसंख्या असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाचे गणित जुळविणे शक्य झाले नाही. भाजपच्या ४ सदस्यांनी दगा दिल्यामुळे त्यांना सत्तेपासून दूर व्हावे लागले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आविसंचे वेलगूर-आलापल्ली (ता.अहेरी) क्षेत्राचे सदस्य अजय कंकडालवार यांना २९ तर भाजपचे घोट-सुभाषग्राम (ता.चामोर्शी) क्षेत्राचे सदस्य नामदेव सोनटक्के यांना २२ मते तसेच उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे येरकड-रांगी (ता.धानोरा) क्षेत्राचे सदस्य मनोहर पोरेटी यांना २९ तर भाजपचे कालीनगर-विवेकानंदपूर (ता.मुलचेरा) क्षेत्राचे सदस्य युधीष्ठिर विश्वास यांना २२ मते मिळाली.
विजयी गटाकडे काँग्रेसच्या १५ सदस्यांसह आदिवासी विद्यार्थी संघाचे ७ सदस्य होते. याशिवाय भाजपचे ४ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जगन्नाथ पाटील बोरकुटे हे १ सदस्य, तथा राष्ट्रीयय समाज पक्षाचे अतुल गण्यारपवार व वर्षा कौशिक हे २ सदस्य होते. त्यामुळे त्यांचे संख्याबळ २९ वर पोहोचले.
भाजपकडे स्वत:चे १६ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तथा ग्रामसभेचे २ सदस्य असे २२ सदस्यांचे संख्याबळ शिल्लक होते. त्यामुळे भाजपच्या ४ सदस्यांनी दगा दिला नसता तर भाजपचे संख्याबळ जास्त होऊन भाजपला विजय मिळवणे शक्य झाले असते. भाजपने आविसंला सोबत घेऊन सत्ता स्थापनेचा प्रयत्न केला, पण आविसंने अध्यक्षपद आपल्याकडे देऊन उपाध्यक्षपद व काही सभापतीपद तुम्ही ठेवा, असा प्रस्ताव त्यांना दिला. नागपुरात त्यावर गुरूवारी दुपारपर्यंत मंथन झाले. मात्र भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नसल्यामुळे भाजपला सत्तेबाहेर जावे लागले.
दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास निकाल जाहीर होताच आविसं आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष करत जि.प. सभागृहाचा परिसर दणाणून सोडला. यावेळी जि.प.च्या आवारात चांगलीच गर्दी झाली होती. जयघोष करत आतीषबाजी करण्यात आली. कार्यकर्त्यांकडून अभिनंदन स्वीकारल्यानंतर विजयी पदाधिकाऱ्यांची ढोलताशाच्या गजरात गुलाल उधळून मिरवणूक काढण्यात आली.
निवडणुकीप्रसंगी काँग्रेसच्या वतीने निरीक्षक जिया पटेल, अमर वऱ्हाडे, जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी, माजी आमदार दीपक आत्राम, हसनअली गिलानी, पंकज गुड्डेवार, भावना वानखेडे, महेंद्र ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार धर्मरावबाबा आत्राम, ऋतूराज हलगेकर, भाजपच्या वतीने खासदार अशोक नेते, आमदार डॉ.देवराव होळी, मावळत्या जि.प.अध्यक्ष योगिता भांडेकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) धनाजी पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी फरेंद्र कुतीरकर, नायब तहसीलदार सुनील चडगुलवार यांनी काम पाहिले. त्यांना किशोर मडावी, अजय बोडणे या कर्मचाºयांनी सहकार्य केले.

काँग्रेसच्या वाट्याला उपाध्यक्षासह तीन सभापती येणार
काँग्रेस आणि आविसं यांच्यात झालेल्या सत्तासमीकरणात अध्यक्षपदासह एक सभापतीपद आविसंकडे तर उपाध्यक्ष आणि तीन सभापतीपद काँग्रेसला दिले जाणार असल्याची माहिती आहे. विद्यमान अध्यक्ष-उपाध्यक्षांचा कार्यकाळ संपल्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकारी शनिवार दि.४ जानेवारी रोजी पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. सभापतीपदासाठी लवकरच निवडणूक होणार असून अद्याप त्याबाबतचा कार्यक्रम निश्चित झालेला नाही.

विशेष बसगाडीने सदस्य दाखल
जिल्हा परिषदेच्या सदस्यांची पळवापळवी होऊ नये यासाठी भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस-आविसंच्या सदस्यांना सुरक्षित स्थळी ठेवण्यात आले होते. दुपारी २.३० वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरूवात होणार असल्यामुळे २ वाजतापासून सदस्यांना विशेष बसगाड्यांनी जिल्हा परिषदेच्या आवारापर्यंत आणण्यात आले. भाजप-राष्ट्रवादीच्या सदस्यांसोबत आमदार धर्मरावबाबाही आले. यावेळी जि.प.च्या बाहेरील फाटकापासून तर मुख्य इमारतीपर्यंत कार्यकर्त्यांनी हातात हात घालत सुरक्षा साखळी तयार करून सर्व सदस्यांना सुरक्षितपणे इमारतीपर्यंत पोहोचविले.

भाजपच्या ४ सदस्यांनी झुगारला पक्षादेश
भाजपच्या तिकीटवर निवडून आलेल्या विद्या आभारे (विक्रमपूर-फराडा), निता साखरे (मौशीखांब-मुरमाडी), शिल्पा रॉय (दुर्गापूर-वायगाव), श्रीदेवी पांडवला (लक्ष्मीदेवीपेठा-अंकिसा) या चार महिला सदस्यांनी पक्षादेश झुगारत मतदान केले. त्यामुळे भाजपला सत्तेपासून वंचित राहावे लागले. यावर बोलताना जिल्हाध्यक्ष किशन नागदेवे यांनी त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होण्याचे संकेत दिले. भाजपने घोडेबाजाराला प्राधान्य दिले नाही. पण त्या सदस्यांनी पक्षशिस्त पाळली नाही. त्यामुळे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई होईल, असे नागदेवे म्हणाले.

कंकडालवार काँग्रेसच्या वाटेवर?
अध्यक्षपदी निवड होताच अजय कंकडालवार यांना काँग्रेसच्या पदाधिकाºयांनी गाठून काँग्रेसचा दुपट्टा घातला. कंकडालवार यांचा काँग्रेस प्रवेश झाल्याचे त्यांनी सांगितले. त्याच अटीवर त्यांना पाठींबा दिला असल्याची माहितीही काँग्रेस पदाधिकाºयांनी दिली. पण यासंदर्भात आविसं नेते दीपक आत्राम यांना विचारले असता त्यांनी स्पष्टपणे बोलण्याचे टाळून नंतर सांगतो, अशी सूचक प्रतिक्रिया दिली. कंकडालवार यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असून पक्षाचे नेते ना.विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत ते अधिकृत प्रवेश घेतील, असे काही काँग्रेस पदाधिकाºयांनी सांगितले.

अन् राम मेश्राम यांनी घेतली माघार
१५ जि.प.सदस्य असलेल्या काँग्रेसला गेल्या अडीच वर्षात विरोधी बाकांवर बसावे लागले. यावेळी सत्तेत बसायचे या निश्चयाने काँग्रेसने मोर्चेबांधणी केली होती. त्यासाठी पक्षाने जिया पटेल आणि अमर वऱ्हांडे या निरीक्षकांना पाठविले होते. अध्यक्षपद आविसंला देण्याचे ठरल्यानंतर उपाध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून मनोहर पोरेटी यांच्यासह ना.विजय वडेट्टीवार गटाचे अ‍ॅड.राम मेश्राम यांनीही नामांकन भरले होते. त्यांना उपाध्यक्षपदाचे उमेदवार ठेवण्यासाठी ना.वडेट्टीवारही सकारात्मक होते. मात्र जिल्हाध्यक्ष डॉ.नामदेव उसेंडी यांचे निकटवर्तीय असलेले मनोहर पोरेटी हे पक्षाचे जि.प.मधील गटनेता आहेत. त्यामुळे त्यांनाच ही संधी द्यावी अशी भूमिका काँग्रेस निरीक्षकांनी घेऊन अ‍ॅड.मेश्राम यांना अर्ज मागे घेण्याची सूचना केली. अखेर त्यांनी माघार घेतल्यामुळे कोरेटी यांचा विजय सुकर झाला.

वडिलानंतर मुलाला उपाध्यक्षपदाची संधी
नवनिर्वाचित उपाध्यक्ष मनोहर पोरेटी यांचे वडील तुळशीराम पोरेटी हे रांगी (धानोरा) या क्षेत्रातून अनेक वर्ष जि.प.च्या राजकारणात सक्रिय होते. काही काळ त्यांना उपाध्यक्षपदाचीही संधी मिळाली. आता त्यांचे पूत्र मनोहर पोरेटी हे उपाध्यक्षपदी निवडून आल्यामुळे पोरेटी यांच्या घरातील जि.प.च्या राजकारणाची परंपरा कायम राहिली.

Web Title: Ajay Kankdalwar as President of ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.